आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांचे गडकरींना पत्र:नाशिक - मुंबई रस्ता लवकरात लवकर सहापदरी करून आश्वासनांची पूर्तता करण्याचे साकडे

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा मार्ग सहापदरी काँक्रिटचा करावा. हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे.

भुजबळ यांनी गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ४ ऑक्टोबर २०१४ रोजी नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे.

वाहतुकीत अडथळा

पत्रात म्हटले आहे की, नाशिक ते मुंबई हा फोर लेन रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. शहापूर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होतो. जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा प्रसार त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी तासंतास प्रवाशांचा वेळ यामध्ये जात आहे.

नूतनीकरण करा

भुजबळ पत्रात म्हणतात की, लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र, या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू व्हायला शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नूतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबीमधील कामाचे तात्काळ नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

रस्त्याची अत्यंत दुरवस्था

पत्रात पुढे म्हटले आहे की, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१४ मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षाने या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधित कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सहापदरी रस्त्याचे प्रत्यक्ष काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...