आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक एमआयडीसीतील सांडपाण्याची विल्हेवाट महापालिकेने आपल्या मलनिस्सारण केंद्रांमार्फत लावावी या बहुचर्चित मागणीवर अमृत दोन योजनेंतर्गत तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू असताना महापालिकेने आता एमआयडीसीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात घातक केमिकल असल्यामुळे आमच्या मलनिसारण केंद्रांच्या क्षमतेवर परिणाम हाेईल असा दावा करत हे पाणी स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसा अहवलाच ‘निरी’ या संस्थेला सादर केला जाणार आहे.
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उद्याेगांनी वापरलेले पाणी इकडे-तिकडे सोडले गेल्यास ते पुन्हा नदीपात्रात येऊन प्रदूषण वाढते. अनेक लहान माेठ्या नाल्यांद्वारे हे पाणी गाेदावरी व अन्य उपनद्यांमध्ये आल्याचेही दिसून आले. त्यामुळे गोदावरी गटारीकरणविराेधी मंचने न्यायालयात केलेल्या दाव्यात या पाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अनेकवेळा चर्चेत आला.
मुळात, उद्याेगांसाठी वापर हाेऊन बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आहे. मात्र आपल्याकडे यंत्रणा नसल्यामुळे ही जबाबदारी महापालिकेने घ्यावी अशी अनेक वर्षांची मागणी होती.
उद्योजकही त्यासाठी आग्रही होते. दरम्यान, याप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे बैठक झाल्यानंतर त्यांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी अमृत-२ योजनेंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने महापालिकेकडून सल्लागार नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी २.१६ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
नकार देण्याच्या हलचाली सुरू
औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आल्यानंतर ते पालिकेच्या मलनिसारण केंद्रांस अाणण्यास तांत्रिक कारणास्तव नकार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात केमिकलयुक्त, जड धातू आहेत.
तसेच, मलजल वाहिनीला जोडल्या जाणारे औद्योगिक सांडपाण्यात सल्फेटचे उच्च प्रमाण असून सल्फेटचे सल्फाइडमध्ये रूपांतर होऊन हायड्रोजन सल्फाइड तयार होऊन सीवर नेटवर्क पाइपलाइन खराब होऊ शकतात अशी भीती आहे. त्यामुळे उद्याेगांसाठी अमृत दोन योजनेतून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा राहिला तरी हे पाणी कोठे सोडायचे हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.