आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट:आयुक्तांकडून ब्रेक ; पाच वर्षाऐवजी एकाच वर्षाची गॅरंटी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वादग्रस्त 354 कोटींच्या घंटागाडीच्या ठेका मिळवण्यासाठी निविदा अटी शर्थीलाच घनकचरा व्यवस्थापन विभाग व ठेकेदारांनी धाब्यावर बसवल्याची बाब आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या लक्षात आली असून नियमानुसार पाच वर्षासाठी बॅक गॅरण्टी देण्याचे साेडून काही ठेकेदारांनी एकाच वर्षाची बॅक गॅरंटी देण्याचा प्रताप केल्याचे उघड झाले. ठेका मिळवण्यासाठी नियमांना कशा पद्धतीने वाकवले जाते हेही यानिमित्ताने बघायला मिळाला आहे.

पाच वर्षासाठी 2016 मध्ये 176 कोटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका काढला हाेता. मात्र 2021 मध्ये मुदत संपल्यानंतर पुढील पाच वर्षासाठी ठेका देताना डिझेलचे वाढीव दर तसेच अन्य कारणे देत हाच ठेका थेट 354 काेटीपर्यंत गेल्यामुळे संशय व्यक्त झाले. त्यावेळी काही लाेकप्रतिनिधींनी ठेक्याला विराेध केला मात्र पुढे सर्वांनीच साेयीस्कर माैन बाळगले. घंटागाडी ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याची वेळ येत नाही ताेच, तात्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची बदली झाली. त्यानंतर स्थायी समितीची मुदत संपल्यामुळे तसेच नवीन आयुक्त रमेश पवार यांनी पुन्हा एकुणच प्रक्रियेची तपासणी सुरू केल्यामुळे महिने -दाेन महिने वाया गेले.

प्रक्रियेची तपासणी सुरू

पवार यांच्या शंकेचे समाधान हाेवून त्यांनी कार्यारंभ आदेश देण्याची तयारी केली हाेती. मात्र अचानक त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा प्रक्रीया लांबणीवर पडली. दरम्यान, घंटागाडी ठेक्याच्या सुरस कथा ऐकून आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी लेखा विभागामार्फत सर्व प्रक्रियेची तपासणी सुरू केली.

सवलत काेणाच्या अधिकारात?

नियमानुसार काेणत्याही निविदेत जितक्या वर्षासाठी बॅक गॅरण्टी दिली, ती भरणे आवश्यक असते. बॅक गॅरण्टी घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कामात ठेकेदाराने कुचराई केल्यास पालिकेने नुकसान भरपाई मिळवणे शक्य हाेत असते. या ठेक्यात पाच वर्षाची बॅक गॅरण्टी भरून घेणे क्रमप्राप्त हाेते. मात्र काही ठेकेदारांच्या तालावर घनकचरा व्यवस्थापन विभागाने एक वर्षाची बॅक गॅरण्टी घेण्याची तयारी सुरू केली हाेती. ही बाब लक्षात घेत आयुक्त डाॅ पुलकुंडवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यातून त्यांनी पाच वर्षासाठी बॅक गॅरण्टी देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

15 ऑगस्टचा मुहूर्त टळला

यापुर्वी 15 ऑगस्टपर्यंत नवीन ठेकेदाराच्या घंटागाड्या शहरात केरकचरा संकलनासाठी येणार हाेत्या. मात्र, फाईलच्या तपासणीमुळे ते शक्य झाले नाही. आता नवीन घंटागाड्या कधी शहरात येणार असा प्रश्न आहे. नवीन ठेका मिळत नसल्यामुळे जुन्या ठेकेदारांना मात्र मुदतवाढीवर मुदतवाढ मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...