आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिर्ची चौकातील बस दुर्घटनेनंतर जागे झालेल्या जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांच्यासारख्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ट्रॅफिक सेलने अर्थातच रस्ते सुरक्षा समितीच्या सुचवल्याप्रमाणे शहरातील 28 अपघाती ठिकाणांवर अर्थातच ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसवण्याची कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. या संदर्भात कारवाई होत नसल्यामुळे खाते प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी बांधकाम विभागाची कान उघडणीही केली.
10 नोव्हेंबर रोजी प्रमुख अधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये झालेल्या ट्रॅफिक सेल बैठकीत मिर्ची हॉटेल चौकातील बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील विविध अपघात स्थलांचे सर्वेक्षण करून ठोस उपाययोजनांबाबत चर्चा झाली होती. दृश्यमानता महत्वाची असल्याचे सांगून चौकातील सुचना फलक त्यांचे ठिकाण, रंग डिझाईन निश्चीत करणे, विविध ठिकाणी वाहतूक नियोजन व पेट्रोलींगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणे, डिझाईन, मिर्ची चौकातील टेम्पलेट याबाबत रेझिलिइन्ट कंपनीच्या तज्ञांनी अहवाल द्यावा त्यावर त्वरीत काम केले जाईल, असे सांगितले.
तसेच रेझिलिइन्ट इंडीया कंपनीचे राजीव चौबे यांनी सायंटीफिक स्टडी करुन पंधरा दिवसात अपघाती स्थळांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक उपाययोजनासंबंधिचा अहवाल सादर करा अशाही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग व महापालिकेच्या रस्त्यांवर असलेल्या ब्लॅक स्पॉटवर पहिल्या टप्प्यात गतिरोधक बसवले जाणार आहेत.
नऊ महिन्यात 108 जणांचा बळी
जानेवारी ते सप्टेंबर 2022 या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात झालेल्या अपघातांची आकडेवारी या बैठकीत सादर करण्यात आली. त्यात वेगात वाहन चालविल्यामुळे 186 अपघात घडले असून त्यात 60 जणांचा बळी गेला आहे. तर, हेल्मेट परिधान न केल्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये 48 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
येथे उभारणार गतिरोधक
एबीबी सिग्नल, सकाळ सिग्नल, शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, बळी मंदिर, रासबिहारी चौफुली, शिंदे गाव शिवार, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राहू हॉटेल सिग्नल, के के वाघ महाविद्यालय सिग्नल, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहडी गाव फाटा, दत्त मंदिर सिग्नल, पळसे गाव बस स्टॉप, ट्रक टर्मिनल, आडगाव, तपोवन क्रॉसिंग, स्वामीनारायण चौफुली, जुना गंगापूर नाका, नांदूर नाका, मिरची हॉटेल सिग्नल, तारवाला नगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्स लो पॉईंट, एमआयडीसी सातपूर, सिद्धिविनायक चौक, कार्बन नाका, सीबीएस
लवकरात लवकर गतिरोधक बसवणार
शहर अभियंता शिवकुमार वंजारी म्हणाले की, ट्रॅफिक सेलच्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील 28 प्रमुख ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसवले जाणार आहे. जेणेकरून वाहनांच्या वेगावर नियंत्रण प्रस्थापित होऊन अपघातांना आळा बसू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.