आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर:कांद्यासह शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी; नाशिकमधल्या चांदवडमध्ये रास्ता रोको

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्यासह शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली. यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

कांदा, भाजीपालासह शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले. गॅस, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे.

आंदोलनात समीर भुजबळ म्हणाले की, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून, यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केली आहे. भाजीपाला व इतर शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आपल्या शेती पिकांवर नागर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात अवकाळीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधीपक्षनेते अजितदादा पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांतर नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात सुरुवात करण्यात आली. ती मोजक्याच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा अद्यापही शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे नाफेडने बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली.

समीर भुजबळ म्हणाले की, गॅस, पेट्रोलसह, दैनदिन लागणाऱ्या वस्तूंचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कांद्याबरोबरच भाजीपाला व इतर शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी सर्वसामान्य नागरिक महिला अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. शासनाने कांद्यासह शेतमाला हमीभाव द्यावा, गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोखावी, अवकाळी ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जोपर्यंत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. प्रसंगी आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा समीर भुजबळ यांनी दिला.

शेतकऱ्यांचे मरण हेच भाजप सरकारचे धोरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पगार यांनी यावेळी बोलताना केला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता धीराने संकटांचा सामना करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यापुढील काळात देखील आक्रमक आंदोलने करून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असेही पगार म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने चांदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करत आहोत. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर, कोबी व अन्य भाजीपाल्यांचेही भाव रसातळाला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सर्व शेतपिकांना हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात आमदार दिलीप बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे आदी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...