आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिक त्रिरश्मी बुद्धलेणी समूहात सापडल्या आणखी दोन लेणी, 200 वर्षांनंतर गर्द वृक्षराजीत दडलेली 2 भिक्खू निवासगृहे नव्याने उजेडात; मोलाचा पुरातत्त्वीय ठेवा

नाशिक (अभिजित कुलकर्णी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा अमूल्य ठेवा जतन करण्यास प्राधान्य

येथील प्रसिद्ध त्रिरश्मी बुद्धलेणी समूहात आता आणखी दोन लेणींची भर पडली असून त्यासाठी तब्बल २०० वर्षांचा काळ उलटावा लागला आहे. विशेष म्हणजे बुद्धपौर्णिमेच्या एक आठवडा अगोदर या आगळ्यावेगळ्या दोन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला असून त्यामुळे देशातील बुद्धलेणींच्या इतिहासात आणि संख्येत नव्याने भर पडली आहे.

लेणी अभ्यासक आणि लिपीतज्ञ सुनील खरे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक राकेश शेंडे यांना पावसाळा लक्षात घेता लेणींच्या वरच्या भागातून आतमध्ये झिरपणारे पाणी थांबवण्याची गरज निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार तेथील नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले असता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे वरिष्ठ कर्मचारी सलीम शेख यांना एका घळीत, झाडांनी वेढलेली दोन भिक्खू निवासगृहे आढळली. त्यांनी शेंडे यांना याबाबत माहिती दिली. लेणी अभ्यासक अतुल भोसेकर, सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर यांना त्याविषयी कळताच तेदेखील तेथे पोहोचले व या भिक्खू निवासगृहांची पाहणी केली.

अतिशय बिकट वाटेने, नुकत्याच झालेल्या पावसामुळे, घसरड्या डोंगराच्या उतारावरच्या मार्गावर या दोन लेणी कोरलेल्या दिसल्या. त्यांचा अभ्यास करून पुरातत्त्वीय निकषानुसार हे दोन्ही भिक्खू निवासगृह इ.स. दुसऱ्या शतकातील असल्याचे अतुल भोसेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. त्यापैकी एका भिक्खू निवासगृहात दोन भिक्खू राहत असावेत, तर दुसऱ्यात एकच भिक्खू राहत असावा असे तेथील रचनेवरून दिसते. दोन्ही लेणींमध्ये व्हरंडा आहे. या लेणीत भिक्खूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौथरा कोरला आहे तसेच ध्यान करण्यासाठी, लेणींच्या बाहेर एक कोढी कोरण्यात आली आहे. या ध्यान कक्षावरून नाशिकचे विहंगम दृश्य दिसते. ध्यान करण्यासाठी अशी विशेष व्यवस्था कान्हेरी आणि वाई येथील बुद्धलेणींत पाहायला मिळत असल्याचेही भोसेकर यांनी नमूद केले.

हा अमूल्य ठेवा जतन करण्यास प्राधान्य
सर्वप्रथम या दोन लेणी पाहिल्या तेव्हा खूप आनंद झाला. हा ठेवा अमूल्य आहे. त्याचे जतन, संवर्धनास प्राधान्य असेल. या लेणी समूहांतच त्यांचा अंतर्भाव केला जाईल. लोकांना जाता यावे यासाठी वाट बनवणे, संरक्षक कठडे उभारण्यास चालना दिली जाईल. -राकेश शेंडे, वरिष्ठ संरक्षण सहायक, पुरातत्त्व विभाग

या दोन्ही लेणींचे दस्तऐवजीकरण मैत्रेयी भोसेकर आणि सुनील खरे यांनी केले असून लवकरच ते पुरातत्त्व विभागाला सोपवण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात असलेल्या ९८० बुद्धलेणींमध्ये आता या दोन लेणींची भर पडली असून लेणी अभ्यासकांमध्ये परिसरातील अन्य लेणी समूहांमध्येदेखील अशा प्रकारच्या आणखी लेणी सापडू शकतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

रोमांचित करणारा क्षण
नालेसफाई सुरू असताना कपारीत जरा मोठा खड्डा दिसला. निरखून पाहिल्यावर कोरीव काम लक्षात येताच वरिष्ठांशी संपर्क साधला. टीमसह काटे, झुडपे बाजूला करताच एवढी वर्षे दडून राहिलेल्या या दोन लेणी पाहून अक्षरश: हरखलो. २५ वर्षांच्या नोकरीतील हा रोमांचक क्षण होता. - सलीम पटेल, वरिष्ठ कर्मचारी, पुरातत्त्व विभाग.

१८२३ मध्ये प्रथम दस्तऐवजीकरण : कप्तान जेम्स डेलामीन या ब्रिटिश सैन्याधिकाऱ्याने १८२३ मध्ये सर्वात पहिल्यांदा नाशिक येथील “ त्रिरश्मी बुद्धलेणीं”चे दस्तऐवजीकरण (documentation) केले आणि जगासमोर ही बुद्धलेणी प्रकाशित केली. तेव्हापासून असंख्य इतिहास संशोधक, पुरातत्त्वविद, अभ्यासक आणि पर्यटक ही बुद्धलेणी पाहून गेले, अभ्यासून गेले. अनेकांनी यावर PhD केली. अनेक शोधनिबंध या लेणींवर जगभरात प्रकाशित झाले आहेत.

लेणी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील असाव्यात
या भिक्खू निवासगृहांची एकूण संरचना पाहता आणि पुरातत्त्वीय निकषांनुसार ही लेणी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील असाव्यात. लेणींच्या बाहेर असलेला ध्यानकक्ष आणि आतील दगडी बैठक हे या समूहातील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. - मैत्रेयी भोसेकर, पुरातत्त्वविद आणि लिपीतज्ञ

बातम्या आणखी आहेत...