आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रोही साहित्य संमेलन का भरते?:याचा विचार परंपरावादी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी करावा - सूर्योदय साहित्य संमेलनाध्यक्ष बी. जी. वाघ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी साहित्याला मोठी परंपरा लाभली आहे. साहित्य समृद्ध करण्यात विचारवंत, लेखक, कवी, संत आणि महापुरुषांनी योगदान मोठे आहे. इतकेच नव्हे तर अभंग, लावणी, जलसे यातून मराठी साहित्य सर्व दूर पसरले आहे. परंतु विद्रोही साहित्य संमेलन का भरते ? याचा विचार परंपरावादी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी करायला हवा. खरे म्हणजे विद्रोह हा साहित्याचा मूलधर्म आहे, साहित्यात सत्य, सौंदर्य आणि स्वातंत्र्य असेल, तरच खरे साहित्यिक तयार होतात, असे प्रतिप्रादन प्रसिद्ध लेखक, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.

साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. ५ मार्च २०२३ रोजी नाशकात एक दिवसीय राज्यस्तरीय विसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बी. जी. वाघ बोलत होते. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध लेखक व कवी पी. विठ्ठल, स्वागताध्यक्ष प्रा. सुमन मुठे, लेखक विलास मोरे, मानवधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. प्रकाश कोल्हे, सूर्योदय मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, परेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बी.जी. वाघ पुढे म्हणाले की, सध्या बहुसंख्यवाद सुरू असून यामध्ये अल्पसंख्यांकांची पिळवणूक होत आहे. लेखकाला मोठा धोका झुंडशाहीचा असतो, व्यक्ती स्वातंत्र्य हे समूहवादातून संकुचित होते. याचा मराठी साहित्यात विचार व्हायला हवा. मानवी चैतन्य हे बंड करून उठते, तसेच विचारवंतांना सत्ताधारी लोकांपासून धोका असतो, लेखकाची कवीची भाषा ही जागतिक असावी, जागतिक साहित्य हे अजरामर असते, असेही वाघ म्हणाले.

यावेळी लेखक कवी विठ्ठल यांनी सांगितले की, वास्तविक पाहता कला साहित्य या जगण्याच्या दुय्यम गोष्टी आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य कधीही मिळाले नव्हते. परंतु साहित्य मानसाने कसे जगावे हे शिकवते, तो जगण्याचा भाव आहे, त्यामुळे साहित्य हे चिरंतन आहे. साहित्य या क्षेत्रात धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन असायला हवा लेखक कोणत्याही गटाचा जातीचा धर्माचा नसतो, तो संपूर्ण मानव जातीचे प्रतिनिधित्व करतो, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रा. डॉ. प्रकाश कोल्हे, स्वागताध्यक्ष प्रा. सुमन मुठे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. बी.जी. वाघ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सावळीराम तिदमे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जनार्दन माळी, कवी संजय चौधरी, कवी रवींद्र मालुंजकर, गिरीश पाटील, पुंजाजी मालुंजकर, प्रकाश काळे, नंदकुमार दुसाने, विजय महाले यांच्यासह साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.बी. महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज कुवर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...