आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये दीड एकरावरील कांद्याची होळी:हमीभाव-अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटाने शेतकरी हतबल, कांद्याच्या पंढरीत शिमगा

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कांद्याचा प्रश्न गंभीर होत असताना नाशिकमध्ये कांदा शेतकऱ्यांवर कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे. कांद्याला हमीभाव न मिळाल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता दीड एकरावरील कांदा जाळला आहे.

एकीकडे कांद्याला भाव मिळत नसताना राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली रब्बी पीके मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांनी होळीच्या दिवशी शेतातील उभे कांदे जाळले.

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याची होळी पेटवली आहे. या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. सरकारच्या धोरणांना वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे.

बळीराजा ढसाढसा रडला

केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकऱ्याने व्यथा मांडली. यावेळी दिवसरात्र एक करून पिकवलेला कांदा आपल्या डोळ्यादेखील जळताना पाहून शेतकरी राजा ढसाढसा रडताना दिसला.
कांद्याच्या पंढरीत शिमगा
बाजार समित्यांमध्ये येऊन नाफेड कांदा खरेदी करेल अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केली. मात्र अजूनही नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कांद्याची होळी पेटवत संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने शिमगा केला. नाशिक जिल्हा हा कांद्याची पंढरी म्हणून संपूर्ण आशिया खंडात ओळखला जातो. कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ही सर्वांना परिचित आहे. मात्र याच कांद्याच्या पंढरीतील शेतकऱ्यांना डोळ्यादेखत कांद्याचीच होळी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...