आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना:दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल- अजित पवार

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकमधील घटनेने मन सुन्न झाले- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

आम्ही सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी- आदित्य ठाकरे

या घटनेबाबत बोलताना पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे म्हणाले की, नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.

नाशिकमधील घटनेने मन सुन्न- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे जी घटना घडलीय त्यामुळे मन सुन्न झाले. ज्यांनी या घटनेत प्रियजन गमावले त्यांच्या या नुकसानीबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाला प्रार्थना करतो.

बातम्या आणखी आहेत...