आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी लाइव्ह रिपोर्ट:ऑक्सिजन गळती ते अंत्यविधीचा प्रवास; रुग्णांची तडफड, नातेवाइकांचा आक्रोश अन् मृतदेहांचा खच

नाशिक25 दिवसांपूर्वीलेखक: अशोक गवळी
  • कॉपी लिंक
  • मृतांमध्ये तरुणांची संख्या मोठी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या रस्त्यांवर सर्वत्र धूरच धूर... रुग्णालय कर्मचाऱ्यांची धावाधाव, डाॅक्टर, नर्सची धावपळ, रुग्णांचे नातेवाईक सैरभैर अाणि बेडवर रुग्णांची मृत्यूशी झुंज... दुसरीकडे फाेनाफाेनी, अग्निशमन दलाकडून अाॅक्सिजन टँकवर पाण्याचा मारा, टेक्निशियनचा फाेन बिझी, ताे थाेड्याच वेळात देवदूतासारखा अाला अन‌् टँक दुरुस्त केला. ताेपर्यंत अाॅक्सिजन तर सगळा गेलाच हाेता, त्याच्याबराेबर २४ जणांचा जीवही गेला हाेता अन् स्मशानात एकाच वेळी अंत्यविधी झाले हाेते.काेविड काळात सगळ्याच चर्चेत अालेल्या जुन्या नाशिकमधील डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या अावारात प्रचंड धूर पसरला हाेता. नक्की काय झालं हे अाधी काेणालाच कळत नव्हतं. मात्र हा धूर अाॅक्सिजन टँकजवळ असल्याने टँक लिकेज झाल्याचं कळताच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला फाेन केला.

तेव्हाच टेक्निशियनला फाेन करा, असा अाेरडा सुरू झाला. त्याला फाेनही केला. मात्र सुरुवातीला ताे देखील बिझी अाला. ते येईपर्यंत अाॅक्सिजन एवढा पसरला हाेता की, शेजारचा माणूसही दिसेना. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला. पण, त्यामुळेही धूर कमी हाेईना. अाॅक्सिजन गळतीची जागा काही सापडेना. रुग्णालयातील डाॅक्टर्स घाबरलेल्या चेहऱ्याने ही गळती बंद करण्यासाठी पुढे सरसावले. पण, रुग्णांचे नातेवाईक त्यांच्या मागे, प्रत्येक वाॅर्डात रुग्णांना धाप लागत असल्याने मग डाॅक्टर अाणि इतर कर्मचारी पुन्हा धावत पळत वर गेले. सर्वत्र हाहाकार माजला हाेता. अारडा- अाेरड, अाक्राेश, रडारडा अाणि अापल्यासह अापल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू हाेती.

काही जणांनी प्राण साेडलेही हाेते. रुग्णांची तडफड सुरू हाेती. नातेवाईकांचे रुग्णांच्या छातीवर पंपिंग करणं, हात- पाय चाेळणं सुरू हाेतं. डाॅक्टर, नर्सही जीवाच्या अाकांताने रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत हाेते. तर काही रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात असतील तेथून सिलिंडर उचलून अापल्या रुग्णांपर्यंत अाणत हाेते. काेणी खांद्यावर, काेणी दाेघे उचलून, काेणी स्ट्रेचरवर तर काेणी झगडा करत सिलिंडर रुग्णांपर्यंत अाणत हाेते. मात्र त्यातील अनेकांच्या रुग्णांनी प्राण साेडले हाेते. अाधी माझ्या रुग्णाकडे चला अशा अाकांताने नातेवाइक डाॅक्टर अाणि नर्सलाही अाेढत हाेते.

एकच रडारड, एकच अाक्राेश याने रुग्णायल हेलावून गेले हाेते. दुसरीकडे अाॅक्सिजन टँक रिपेअर करणारा मेकॅनिक अाला पण टँकमधील संपूर्ण अाॅक्सिजन गेल्याशिवाय कामच करता येत नव्हते. अखेरीस टँक खाली झाली अाणि त्याने काम केले. मात्र सगळा अाॅक्सिजन हवेत विरुन गेला हाेता. काही क्षणांपूर्वीच श्वास घेत असलेल्या तब्बल २४ जणांनी प्राण साेडले हाेते. मृत काेराेना पाॅझिटिव्ह असल्याने संसर्ग पसरू नये म्हणून त्यांना लगेचच पीपीई किट घालण्यात येऊन शववाहिकेतूनच स्मशानात नेण्यात आले. काही वेळापूर्वी जीवंत असलेला अापला माणूस गेल्याने रुग्णाच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला हाेता अाणि स्मशानात एकाच वेळी अनेक मृतदेहांची चिता धगधगत हाेती.

जीव महत्त्वाचा, कोरोना नाही
रुग्णालयात सगळेच काेविड रुग्ण. रुग्णांजवळ गेल्यास संसर्ग हाेण्याचा धाेका. मात्र रुग्णालयात परिस्थितीच अशी उद्भवली की, काेराेनाचा संसर्ग महत्त्वाचा नाही तर रुग्णाचा जीव महत्त्वाचा हाेता. त्यामुळे मास्क, हँड ग्लाेव्हज वगैरे अाहे की नाही याकडे लक्ष न देता फक्त रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. डाॅक्टर, नर्सेस, वाॅर्डबाॅय सगळेच स्वत:ची चिंता सोडून केवळ आणि केवळ रुग्णांचे प्राण कसे वाचतील या प्रयत्नात होते.

..तर मृतांचा खच पडला असता
डॉ. हुसेन रुग्णालयात रुग्णांची अाॅक्सिजन लेव्हल अचानक घसरू लागल्यामुळे नेमके काय झाले याचा शाेध सुरू झाला. त्या वेळी टाकीतून अाॅक्सिजन पुरवठा हाेत नसल्याचे समाेर अाले. दुपारी ही घटना घडल्यामुळे वेळीच हालचाल करून दुरुस्ती केली गेली. मात्र हीच घटना रात्री घडली असती तर मात्र मृतांचा खच पडला असता, असे एका जबाबदार अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर खासगीत सांगितले.

आक्रोश आणि अश्रू
सकाळीच वडिलांशी बोललो, त्यांनी नाष्टाही केला. त्यामुळे अाता संकट टळले या अानंदात हाेतो. मात्र, काही क्षणांतच हाेत्याचे नव्हते झाले, असे सय्यद कुुटुंबीय सांगत हाेते. माझे दाजी चांगले हाेते हाे, त्यांच्या जाण्याने माझ्या बहिणीला माेठा मानसिक धक्का बसला अाहे. सांगा अाता मी काय करू, असे सांगताना अविनाश बिऱ्हाडे यांनी हंबरडा फाेडला. हे सर्व एेकताना उपस्थितांचे डाेळेही पाणावले. सगळीकडे केवळ आक्रोशच होता.

आपण यांना गमावले

अमरदीप नगराळे (७४), भारत निकम (४४), श्रावण पाटील (६७), माेहन देवरान खैरनार (६०), मानसी सुनेंद्र शहा (३६), पंढरीनाथ नेरकर (३७), सुनील झाल्टे (३३), सलमा शेख (५९), प्रमाेद वेळूकर (४५), अाशा शर्मा (४५), भय्या सय्यद , रजनी काळे (६१), गीता वाघचाैरे (५०), बापूसाहेब घाेटेकर (६१), वत्सलाबाई सूर्यवंशी (७०), नारायण इरनाईक, (७३), संदीप लाेखंडे (३७), बुधा गाेतरणे (६९), वैशाली राऊत (४६), हमीदाबी सय्यद (४६), नामदेव गवांदे (६०)

मृतांमध्ये तरुणांची संख्या मोठी
मृतांमध्ये तरुण अधिक असल्यामुळे हळहळ व्यक्त हाेत अाहे. ३० ते ४० वयाेगटातील पाच तर ४० ते ५० वयाेगटातील पाच रुग्णांचा समावेश अाहे. ३३, ३५ अशा वयाेगटातील कर्त्या व्यक्ती गमावल्यामुळे हळहळ व्यक्त होत हाेती.

कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष...
आजीला नाष्टा दिला होता. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास अाॅक्सिजन संपला. टँकमध्ये अाॅक्सिजन भरण्यास टंँकर अाला. त्यानंतर काही मिनिटांतच ही घटना घडली. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे जीव गेले. - विकी जाधव, नातेवाईक

सकाळीच बोललो, आता मृतदेह कसा नेऊ
माझे दाजी माझ्याशी सकाळीच बोलले. त्यांची तब्येत चांगली हाेती. मात्र, दुपारी गळतीची घटना घडली आणि आता ते गेले. आता त्यांचा मृतदेह कसा नेऊ?- अविनाश बिऱ्हाडे, नातेवाईक.

घरून आणले होते पाच सिलिंडर
माझ्या काकांची तब्येत सकाळपर्यंत चांगली होती. आमच्याशी ते बोलले आणि अचानक अाॅक्सिजन गळतीची घटना घडली. आम्ही लगेचच घरून व इकडून तिकडून पाच सिलिंडर आणून दिले. मात्र एकही सिलिंडर त्यांना लावता अाले नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. - सय्यद, नातेवाईक

बातम्या आणखी आहेत...