आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवघेणा तुटवडा:कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन; डॉक्टर्सची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांचे बोट नियमावर

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुपारनंतर एका दिवसापुरते मिळाले

जिल्ह्यात अाॅक्सिजनचा पुरवठा गरजेपेक्षा कमी होत असल्याने आता डॉक्टरांनीच रुग्णांना अतिरिक्त ऑक्सिजन देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आयएमएच्या डॉक्टरांना दिल्या. पण, रुग्णांच्या प्रकृतीनुसारच ऑक्सिजन द्यावा लागत असून व्हेंटिलेटरवरील रुग्णांबाबत, तसेच नवीन रुग्ण दाखल करून घेण्याबाबत आता विचार करावा लागेल? असेही अायएमएच्या डाॅक्टरांनी व्यक्त केल्याने जिल्हाधिकारी विरुद्ध अायएमएचे डाॅक्टर अशी स्थिती निर्माण झाली अाहे.

शहरातील खासगी रुग्णालयांत गुरुवारी (दि. २२) ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, ऑक्सिजन पुरवठादारांच्या बैठकीत चर्चा करण्यात अाली. यात आयएमएच्या पदाधिकारी डॉक्टरांनी लिकेज, पाइपलाइन, वाढीव सिलिंडरची उपलब्धी यावरच काम करताे अाहाेत. बुधवारी सकाळपासून स्थिती कठीण झाली आहे. १० रुग्णालयांत तर पुरेसा ऑक्सिजनच नसल्याचेही सांगितले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, खजिनदार डॉ. विशाल पवार, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, तसेच हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. नीलेश निकम, डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. प्रतीक्षित महाजन आदी उपस्थित होते.

रुग्णांवर उपचार करायचे कसे
आम्ही खासगी रुग्णालयांसाठी टास्क फोर्स तयार करत आहोत. तसेच आॅक्सिजन कोट्याबाबत रेशनिंग करणार आहोत. आॅक्सिजन गळती व इतर अनावश्यक वापर होत नाही ना हेदेखील तपासत आहोत. पण १०० रुग्णांना १०० लिटर ऑक्सिजन लागत असेल तर सध्या २५ लिटर म्हणजे अवघा २५ टक्केच मिळत आहे. यातून सर्व रुग्णांना कसा आॅक्सिजन देऊ हा मोठा प्रश्न आहे. - डॉ. हेमंत सोननीस , अध्यक्ष, आयएमए नाशिक.

रुग्णाला अतिरिक्त अाॅक्सिजन देऊ नका
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्याची आॅक्सिजन मागणी ३८ मेट्रिक टन इतकीच होती. यंदा हीच मागणी शंभर मेट्रिक टनाच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात अाॅक्सिजनचा पुरवठा गरजेपेक्षा कमी होत असल्याने आता डॉक्टरांनीच शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त ऑक्सिजन देऊ नये. संनियंत्रण करावे, योग्यप्रकारे रेशनिंग, कमी गळती व्हावी. वाढीव बेडची संख्या सर्व रुग्णालयांनी नाशिक मनपा पोर्टलवर दिली तर हा सर्व डेटा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला सादर केल्यावर नाशिक जिल्ह्याचा पुरवठा वाढवून घेता येईल. रेमडेसिविरचा पुरवठा वाढवून घेता येईल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

१० रुग्णालयांतील ऑक्सिजन संपले
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अाॅक्सिजन गळतीच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हळहळत असतानाच गुरुवारी (दि. २२) सकाळीच शहरातील १० रुग्णालयांचा ऑक्सिजन काही तासांतच संपणार असल्याची माहिती पुढे आली. आपल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवा, असे नातेवाइकांना तर ऑक्सिजन अथवा रुग्णांसाठी पर्यायी रुग्णालयांची व्यवस्था करण्याचा संदेश रुग्णालयांच्या वतीने देण्यात आला. शहरातील नारायणी रुग्णालय, सिक्ससिग्मा, त्रिमूर्ती या रुग्णालयांसह इतर १० खासगी कोविड रुग्णालयांतील ऑक्सिजन दुपारनंतर संपणार असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. तुम्हीच रुग्णांची व्यवस्था करावी, असेही सांगण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा गोंधळ उडाला.

नातेवाईक जिथे संपर्क करत हाेते तेथे बेड अाणि अाॅक्सिजन नसल्याचेच सांगण्यात येत हाेते. अनेकांनी थेट जिल्हाधिकारी अाणि लाेकप्रतिनिधींकडे धाव घेतली. अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आॅक्सिजन उत्पादक, खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, आयएमएचे पदाधिकारी, अन्न व आैषध प्रशासनाचे अधिकारी, जिल्हा रुग्णालयांचे अधिकारी अशी बैठत झाली. त्यात ज्या-ज्या रुग्णालयांत ही ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली त्या सर्वांना दुपारनंतर ऑक्सिजन देण्याचे अाश्वासन मिळाले. अन् सायंकाळच्या दरम्यान एका दिवसापुरता तरी ऑक्सिजन उपलब्ध झाला. दरम्यान शुक्रवारी (दि.२३) ऑक्सिजन उपलब्ध होऊ न शकल्यास प्रश्न कायम राहणार अाहे.

नवीन रुग्ण कसे दाखल करून घेणार ?
आॅक्सिजनअभावी रुग्णांचे हाल नको म्हणून आम्ही इतर रुग्णालयांशी टायअप करून त्यांच्याकडे अतिरिक्त शिल्लक असलेले आॅक्सिजन सिलिंडर मागवतो. रुग्णांच्या प्रकृतीनुसारच त्यांना अाॅक्सिजन द्यावा लागताे. रुग्णालयात आवश्यक नसेल तेथील आॅक्सिजन आम्ही बंद करून तो गरजू रुग्णांसाठी वापरत आहोत. पण गरजेनुसार ऑक्सिजन हवा आहे. अन्यथा नवीन रुग्ण दाखल करण्याबाबत विचार करावा लागेल.- डाॅ. ज्ञानेश्वर थोरात

वस्तुस्थितीनुसार वाढीव ऑक्सिजन हवा
खासगी रुग्णालयांनी बेड क्षमता वाढवली आहे. त्यामुळे आॅक्सिजनची मागणीही वाढली आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या आम्ही निदर्शनास आणून दिले अाहे. जिल्हाधिकारीदेखील ही वस्तुस्थिती मान्य केली. त्यानुसार आम्हाला वाढीव ऑक्सिजन हवा आहे. - डाॅ. रमाकांत पाटील

बातम्या आणखी आहेत...