आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजदर वाढीच्या विरोधात 28 फेब्रुवारीला आंदोलन:दरवाढ प्रस्तावाची होळी करणार, समन्वय समितीचा निर्णय

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीने 67, 644 कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी सरासरी 37 टक्के म्हणजे सरासरी 2.55 रु. प्रति युनिट याप्रमाणे प्रचंड अतिरेकी दरवाढ मागणीचा प्रस्ताव दाखल केला आहे. ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतून विविध औद्योगिक, शेतकरी व ग्राहक संघटना व वीज ग्राहक यांच्याकडून आयोगाकडे 15 फेब्रुवारी पर्यंत हजारोंच्या संख्येने सूचना व हरकती दाखल करण्यात येतील तर संपूर्ण राज्यात 28 फेब्रुवारी रोजी 11 वाजता वीजदरवाढ प्रस्तावाची होळी आंदोलन करण्याचा निर्णय समन्वय समितीच्या परिषदेमध्ये घेण्यात आला आहे.

स्थानिक पातळीवर मोर्चे

स्थानिक आमदार, खासदार व मंत्री यांची समक्ष भेट घेऊन ही दरवाढ रद्द करणे का आवश्यक आहे, याची संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घ्यावा यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह याप्रश्नी निर्णायक बैठक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या वीजदरवाढीच्या विरोधात यावेळी राज्यात सर्वत्र स्थानिक पातळीवर मोर्चे आयोजित करण्यात येतील.

सहभागी होण्याचे आवाहन

वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल व राज्य सरकार व महावितरण यांना निवेदन देण्यात येईल. तसेच राज्यात जेथे जेथे शक्य होईल, तेथे तेथे ग्राम सभेमध्ये वीजदरवाढ विरोधी ठराव करून शासन, कंपनी व आयोगाकडे पाठविण्याचा निर्णयही या परिषदेमध्ये घेण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यात सर्वत्र वीज ग्राहकांनी या दरवाढविरोधी आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन केले आहे.

ग्राहकांवर घातक परिणाम

या परिषदेमध्ये राज्यातील 22 जिल्ह्यातील 200 हून अधिक संघटना प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रताप होगाडे यांनी महावितरणच्या प्रस्तावाची तपशीलवार माहिती दिली व त्याचे राज्यावरील व ग्राहकांवरील संभाव्य घातक परिणाम स्पष्ट केले. यावेळी मालेगांवचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री एंड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, डॉ. एस. एल. पाटील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी रावसाहेब तांबे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रशांत मोहोता यांसह मान्यवर उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...