आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक स्मार्ट सिटीतील गावठाण पुनर्विकास योजनेंतर्गत २०० कोटी रुपयांच्या रस्ते योजनेची तिसरी मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर १९६ रस्त्यांपैकी जेमतेम ९२ रस्त्यापची कामेच पूर्ण झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित ठेकेदाराला काम करण्यासाठी २१ डिसेंबर २०२३ पर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ देताना दंडात्मक कारवाईऐवजी त्याला ७५ कोटी रुपयांचा पेठरोड पुनर्विकासासाठी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्मार्ट सिटीनेच मान्य केल्यामुळे हा कारभार वादात सापडत आहे.
पीएमओकडे तक्रार
स्मार्ट सिटीच्या कामांची मुदत यापूर्वी संपुष्टात आली आहे. मात्र अनेक कामे प्रलंबित असल्यामुळे केंद्र शासनाने जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र मुदत वाढ देताना नवीन कोणत्याही कामासाठी निविदा काढता कामा नये अशी केंद्र शासनाने तंबी दिली असताना स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ परस्पर काही जुन्या नियमांचा आधार घेत ठेकेदारांना वाढीव कामे देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पेठरोडच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून ही बाब केंद्र शासनाची फसवणूक करण्याजोगी असल्यामुळे या संदर्भात पीएमओकडे तक्रार करण्याचा निर्णय गावठाणामधील काही जुन्या जाणत्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
या प्रकल्पाच्या निमित्ताने शहरात भाजपाची बदनामी होत असल्यामुळे हे पाऊल उचलले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र शासनाने नवीन निविदा काढू नये असे आदेश दिल्यानंतर संचालक मंडळांनी परस्पर नवीन किती कामांसाठी परवानगी दिली आधी मुद्दे चौकशीच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
पीएमओकडे तक्रारीच्या हलचाली
एवढेच नव्हे तर नवीन कामांसाठी निविदा काढता येत नसल्याच्या केंद्र शासनाच्या अटींची अडचण लक्षात घेत निविदेतील जुन्या नियमांचा आधार घेत ''स्कोप ऑफ वर्क''च्या नावाखाली वाढीव कामे देण्यासाठी संचालक मंडळाकडून परस्पर निर्णय होत असल्यामुळे एकूणच कारभाराची तक्रार अाता पीएमओकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नक्की प्रकरण काय?
गावठाण पुनर्विकास योजनेंतर्गत स्मार्ट सिटीने जुने नाशिक तसेच पंचवटी भागातील साडेचार ते नऊ मीटरचे चांगले रस्ते फाेडले. २०१९ मध्ये २०१ काेटी रुपये खर्चून हे १७१ रस्ते नव्याने करण्याबाबत कार्यारंभ अादेश दिले. मात्र, ६ मार्च २०२२ मध्ये ३० महिन्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर बहुतांश रस्ते पूर्ण झालेले नाहीत.
दरम्यान, काेराेनामुळे कामे करण्यास विलंब झाल्याचे कारण देत दोन वेळा मुदतवाढ देताना दंड करण्याऐवजी अतिरिक्त २१ लहान व पाच मोठ्या रस्त्यांची काम दिले गेले. दरम्यान ही मुदतही २१ एप्रिलला संपली. मात्र याच मदतीने ४८ मोठे रस्ते व ४४ लहान रस्ते अशा ९२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
पेठरोड दुरुस्तीचे काम
दोन्ही मिळून २१.८३ किलोमीटरची कामे पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप ८२ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करून घेताना ठेकेदारास मुदतवाढ देणे जसे क्रमप्राप्त आहे, त्याच पद्धतीने कामास विलंब झाला म्हणून दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते.
मात्र आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी यासंदर्भात स्मार्ट सिटीकडून लेखी माहिती मागविली असता त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत काही कारणास्तव प्रगतीपथावर अशा रस्त्यांच्या कामांसाठी मुदतवाढ दिल्याचा दावा करत दंड वसुली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे उत्तर दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सोडून त्यास साडेसहा किमीच्या पेठरोड दुरुस्तीचे काम देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितल्यामुळे या मागील अर्थकारण चर्चेत आले आहे.
केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे तक्रार
पंचवटी व जुने नाशिक या दोन्ही गावठाणातील रस्त्यांची कामे अपूर्ण असून असे असताना ठेकेदाराला नवनवीन कामे देण्याचा सपाटा सुरू आहे. २०१८ मधील जुन्या दराने पेठरोडचे काम वादग्रस्त ठेकेदाराला देण्याची बाब बेकायदेशीर असून संबंधित काम पालिकेने पूर्ण करावे असे आदेश राज्याच्या नकार विकास खात्याने दिल्यानंतरही कानाडोळा केला जात आहे. स्मार्ट सिटीच्या एकूणच कारभाराची चौकशी करण्यासाठी मी स्वतः केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. - अॅड. राहुल ढिकले, आमदार
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.