आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik | Sahitya Sammelan | Political Leaders Run In Nashik, Why Not In Osmanabad? Cultural Affairs Minister Amit Deshmukh Was Not Even Honored On Stage By Sahitya Parishad In Osmanabad

दिव्य मराठी विशेष:नाशकात राजकीय नेते चालतात, उस्मानाबादेत का नाही? उस्मानाबादेत साहित्य परिषदेकडून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांनाही दिला नव्हता मंचावर मान

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक करून दाखवणाऱ्या व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना साहित्य परिषदेने संमेलनापासून चार हात दूर ठेवले होते.

मात्र, नाशिकमध्ये ३ ते ५ डिसेंबरदम्यान होत असलेल्या ९४ व्या साहित्य संमेलनात स्वागताध्यक्षपदापासून संमेलनाच्या आयोजनापर्यंतची जबाबदारी राजकीय नेत्यांवर आहे. साहित्य परिषदेचा हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल करत अध्यक्ष कौतिकाराव ठाले-पाटलांना जाब विचारणार आहोत, असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर यांनी दिला आहे.

गेल्या वर्षी (२०२०) १०, ११, १२ जानेवारीला उस्मानाबादेत ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. दुष्काळी पार्श्वभूमी आणि त्यातून आलेले मागासलेपण, अशा वातावरणातही उस्मानाबादकरांनी हे संमेलन ऐतिहासिक करून दाखवले. स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांपासून विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांनी या संमेलनासाठी योगदान दिले.

संमेलनाच्या एकंदर तयारीसाठी तसेच नियोजनासाठी स्थानिक स्तरावर खासदार, आमदार, नगराध्यक्षांना विचारात घेण्यात आले होते. साहजिकच त्यांच्याकडून आर्थिक मदतही घेण्यात आली. मात्र, संमेलन दोन दिवसांवर आल्यानंतर ऐनवेळी कार्यक्रमाची पत्रिका बाहेर आली. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावांचा समावेश नसल्याची बाब समोर आली.

एकाही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या पत्रिकेत स्थान देण्यात आले नव्हते. याबद्दल कार्यकर्त्यांनी आयोजकांना विचारणा केल्यानंतर मराठी साहित्य परिषदेचीच ही भूमिका असल्याचे सांगण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही साहित्य परिषदेने या वर्षीपासून राजकीय नेत्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर न बोलावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

अर्थातच संमेलनाच्या उद्घाटन समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींना मंचावर आमंत्रित केले गेले नाही. प्रेक्षकांच्या खुर्चीवर बसवण्यात आलेल्या मंत्र्यांचा, आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आयोजकांकडून जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला.

याबद्दल स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटलांना विचारणा केली तसेच मंत्रिमहोदयांना सन्मानाने मंचावर बाेलवा, अशी विनंती केली. मात्र पाटील यांनी यापुढे राजकीय नेत्यांना साहित्य संमेलनाच्या मंचावर न बोलावण्याचा निर्णय झाला असून, राजकीय नेते मंचावर असलेले साहित्यिकांना आवडत नाही, असे स्पष्ट केले. उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलनाच्या आयोजकांबद्दल तसेच साहित्य परिषदेबद्दल यानंतर नाराजीचा सूर दिसून आला.

वर्षातच का बदलली भूमिका?
नाशिकच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ आहेत. उद्घाटन समारंभासाठी काही मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, निमंत्रित केले आहे. राजकीय नेत्यांना संमेलनापासून दूर ठेवण्याची साहित्य परिषदेची भूमिका उस्मानाबादपुरतीच सीमित होती का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याबद्दल साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही.

सांस्कृतिक मंत्र्यांचा अवमान
ज्यांच्या मदतीतून संमेलन पार पडले, त्या लोकप्रतिनिधींच्या नावाचाही उस्मानाबादच्या संमेलन पत्रिकेत उल्लेख नव्हता. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना मंचावर आमंत्रित केले गेले नाही. याउलट स्थानिक अधिकारी मंचावर होते. राजशिष्टाचाराचा भाग पाळला जात नव्हता. आम्ही ठाले-पाटलांच्या निदर्शनास आणून दिले.

मात्र, त्यांनी राजकीय नेत्यांना मंचावर बोलवायचे नाही, असा निर्णय झाल्याचे आम्हाला सांगितले. नाशिकच्या संमेलनात राजकीय नेते चालतात, मग उस्मानाबादेत का नाही, याचे उत्तर ठाले-पाटलांनी द्यावे. त्यांना याबाबत जाब विचारणार आहोत. - उमेश राजेनिंबाळकर, प्रदेश सचिव, युवक काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...