आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चोखोबा ते तुकोबा' वारी उद्या नाशिकमध्ये:पुण्यातील संत चोखामेळा अध्यासन केंद्रातर्फे आयाेजन, देहूत होणार वारीचा समारोप

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे, यांनी 'चोखोबा ते तुकोबा' या समता वारीचे आयोजन केले आहे. समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन मंगळवेढा येथून 1 जानेवारी रोजी निघालेल्या समता वारीचा समारोप 12 जानेवारी रोजी देहूगाव येथे होईल. ही समतेची वारी महाराष्ट्राच्या विविध गावातून जाणार आहे.या समता वारीचे नाशिक शहरात आगमन उद्या शनिवार 7 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे.

महाराष्ट्र राज्याला सामाजिक समतेची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा दृढ करण्यात महाराष्ट्रातील संतांचा मोलाचा वाटा आहे. समाज एक संघ असेल आणि भेद विरहित असेल तरच आपण सबळ आणि समर्थ होऊन भावी काळातील आव्हानांना तोंड देऊ शकतो. म्हणूनच आपल्याला समाजाच्या भल्याचा विचार करायला हवा आणि म्हणूनच संतांनी सांगितलेल्या समतेच्या मार्गाने जावे लागणार आहे.

या वारीत प्रमुख उपस्थितांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज ह.भ. प.श्री शिवाजीराव मोरे महाराज देहू तसेच श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक समाज कल्याण अधिकारी, मुंबई असणार आहेत. दुपारी चार वाजता श्री जनार्दन स्वामी मठ येथे वारीचे आगमन होईल तेथून पुढे द्वारका मार्गे मोठा राजवाडा, बागवान पुरा, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश वाडी, काट्या मारुती, नाग चौक मार्गे काळाराम मंदिरात वारी सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचेल. काळाराम मंदिरात वारकऱ्यांच्या हस्ते महा आरती संपन्न होईल आणि सायंकाळी 7 वाजता समता संदेश सभा होणार आहे.

समता संदेश सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ समाजसेवक मा. श्री वाल्मीक (तात्या) निकाळजे उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड असतील.

हा उपक्रम म्हणजे समन्वयवादी विचारांची एक पाऊलवाट आहे, म्हणूनच समतायुक्त समाजाच्या उभारणीत सहभागी होण्याचे आव्हान नाशिकचे समता वारी प्रमुख शिवाजीराव बोंदार्डे तसेच संयोजक प्रा.निलेश खैरनार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...