आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील महापालिकेच्या जलतरण तलावांवर समस्यांचा डोंगर निर्माण झाल्याचे चित्र डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. तरणतलावातील काही ठिकाणी लॉकर तुटले आहेत तर काही ठिकाणी जिमच्या साधनांना गंज चढला आहे. जलतरण तलावावर येणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने तलावांची अवकळा कायम आहे.
यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत. शहरातील महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाने आजतागायत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडवले. मात्र, सध्या या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून उन्हाळी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या जलतरणपटूंना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे.
याठिकाणी अनेक समस्या अाहेत. महापालिका त्याकडे हेतूपुरस्सर कानाडोळा करीत असल्याची तक्रार नागरिकांकडून डी. बी. स्टारकडे करण्यात आली. या ठिकाणी शहराच्या अनेक भागांतून पोहण्यासाठी नागरिक येतात. मात्र, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हव्या तशा सुविधा नागरिकांना मिळू शकत नाहीत. सध्या सुट्यांचा सीझन आहे.
या काळात दैनंदिन तिकीट काढून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, तिकीट देणारे कर्मचारी मोजकेच असल्याने लोकांना खिडकीबाहेर ताटकळत बसावे लागत आहे. जलतरण तलावावर पोहणे शिकण्यासाठी अनेक लोक येतात. मात्र, येथे प्रशिक्षकांची संख्या ही कमी आहे. त्यामुळेही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
जीवरक्षकांची संख्याही अपुरी
सावरकर जलतरण तलावावर जीवरक्षक नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून पोहावे लागत असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे.
फायबरच्या पत्र्यांचीही झाली दुरवस्था
शहरातील सावरकर जलतरण तलावाची गेल्या अनेक दिवसांत दुरुस्ती झालेली नाही. या ठिकाणी मध्यंतरी काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. त्यावेळी येथील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची दुरुस्ती करण्यात आली, मात्र लॉकर अजूनही नादुरुस्त आहेत. तसेच या ठिकाणीही प्रशिक्षकांची कमतरता आहे. तर,जलतरण तलावावर फायबरचे पत्रे टाकण्यात आले आहेत. ते निकृष्ट असल्याने त्याचीही तुटफुट झालेली आहे.
दुरवस्थेकडे लक्ष द्यावे
जलतरण तलावाच्या दुरावस्थेकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.सावरकर जलतरण तलावाच्या शॉवर, लॉकरची दुरुस्ती झालेली नाही. तसेच या ठिकाणी प्रशिक्षकांची ही कमतरता आहे. - अॅड. योगेश मोरे, नागरिक
तलावासंदर्भात माहिती घेणार
त्र्यंबकरोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या तुटफुट आणि समस्यांबाबत माहिती घेतली जाणार असून याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात केली जाईल.
- नितीन नेर, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग
नळांना पाणीच नाही
मुख्य जलतरण तलावात अांघोळ करण्यासाठी असलेल्या शॉवरची दुरुस्ती करण्यात आली तरी काही ठिकाणच्या नळांना पाणीच येत नसल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी बाथरूम, टॉयलेट यांचे दरवाजे तुटलेले आहेत. तसेच, काही कपाटाचे लॉकरही तुटलेले आहे. तसेच, स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने बाथरुममध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे.
दुरुस्तीचा प्रस्ताव सादर
जलतरण तलावाच्या दुरुस्तीचा व कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना देण्यात आलेला असून लवकरच दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. - रूपचंद काटे, व्यवस्थापक, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.