आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामधील तक्रारीची दखल न घेता याउलट नाराजांचे श्राद्ध घालू असे विधान खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अर्थात शुक्रवारी वेगवान घडामोडी घडून सेनेतील 11 माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करून राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. या नगरसेवकांचा सकाळी साडेदहा वाजता अधिकृत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
दिवाळीनंतरच शिवसेनेतील हा नाराज नगरसेवकांचा गट शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपल्या अडचणींचे निराकरण होईल या अपेक्षेने हा गट थांबून होता. राऊत यांनी गेल्या महिन्यामध्ये दौरा केल्यानंतर त्यांच्याकडे नाराज पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. आता या तक्रारीचे दखल न घेता या उलट संबंधित गटाचे श्राद्ध झाले असे विधान केल्यानंतर गुरुवारी दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या व त्यातून काही पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नाराज १० ते १२ माजी नगरसेवकांचा गट मुंबईत रवाना झाल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा या बंगल्यावर सर्वांचे स्वागत करून सकाळी पक्ष प्रवेश केला जाईल असे जाहीर केले. त्यानुसार सकाळी साडेदहा वाजता सर्वांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दलाल म्हणून हिणवल्या गेल्याचा समाचार घेत उद्धव सेनेवर गंभीर आरोप केले
भाजप व मनसेलाही धक्का
गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भाजपाचे शहर प्रवक्ते तसेच नगरसेविका कोमल मेरोलिया यांचे वडील प्रताप मेहरोलीया यांनी देखील हातात ढाल तलवार घेतली. मित्र पक्षालाच हात लावल्यामुळे येत्या काळात शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यांनी केला प्रवेश
माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह पूनम दिगंबर मोगरे, सूर्यकांत लवटे, आरडी धोंगडे, चंद्रकांत खाडे, ज्योती श्याम खोले, सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, जयश्री खर्जुल, श्याम साबळे, संगीता अमोल जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
ये तो झाकी है..
संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर अकरा नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आले आहेत. या सर्वांचे माध्यमातून नाशिकचा विकास साधला जाईल. लवकरच उद्धव सेनेमध्ये अन्य नाराज नगरसेवक देखील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येतील.
- हेमंत गोडसे, खासदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.