आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया असली तरी कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनातून नियुक्ती अावश्यक असते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा बदल्यांची प्रक्रिया राबवली. १४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश केले. यात पती-पत्नी एकत्रिकरण, समुपदेशनांतर्गत रिक्त जागा असताना एकतर्फी आदेश केल्याने कर्मचाऱ्यांनी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
मुख्यालयातील १८ कर्मचाऱ्यांना तालुका मुख्यालयात पाठवताना अवघ्या दोन कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केल्याने या शाखा रिकाम्या झाल्याने कामकाज कसे होणार असा प्रश्न आहे.
नक्की प्रकरण काय?
कर्मचाऱ्यांच्या ३ ते ५ वर्षांनंतर बदल्या हाेतात. यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना अचानकपणे एक दिवस अगाेदर सकाळी ११ वाजता समुपदेशन प्रक्रियेसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांना बदलीसाठी १० पर्यायांची विचारणा केली. पण मागणी केलेल्या अन् रिक्त जागेवर मात्र नियुक्ती दिली नाही. अन् काेणाचीही बदली रद्द करणार नसल्याचे सांगत कोणी तसा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिल्याने या कर्मचाऱ्यांत नाराजी व्यक्त हाेत आहे.
शासकीय नियमानुसार पती पत्नी एकत्रीकरणास प्राधान्य असतानाही पतीची एकीकडे तर पत्नीची दुसरीकडे बदली केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. येत्या सोमवारपर्यंत (दि. १५) बदली मिळालेल्या जागेवर पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.
१८ च्या तुलनेत दोन जणांचीच नियुक्ती
या संपूर्ण बदल्यांच्या प्रक्रियेत मुख्यालयातील १८ कर्मचाऱ्यांना तालुक्यांना पाठवले आहे. केवळ २ कर्मचाऱ्यांना मुख्यालयात नियुक्त करण्यात अाले आहे. त्यामुळे टंचाई, सामान्य, महसूल, गृह अाणि गाैण खनिज शाखा रिकाम्या झाल्या असून कामकाज कसे चालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातून मुख्यालयात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्र्यंबक तहसीलचे अार. एस. अागलावे अाणि इगतपुरी तहसीलचे एस. डी. खाडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात लेखा शाखेत नियुक्ती दिली आहे.
अारडीसींच्या गैरहजेरीत बदल्या
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ रजेवर आहेत. प्रभारी कार्यभार उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरेंकडे आहे. ते अास्थापना मुख्य असताना त्यांच्या गैरहजेरीत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात अाल्या. ३१ मे पर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदत असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी घाईघाईतच या बदल्या केल्याची महसूल वर्तुळात चर्चा सुरू आहे.
..या पदांच्या बदल्या
महसूल सहायक : ६८ अव्वल कारकून : ४३ मंडल अधिकारी : १९ मंडल अधिकारी ते अव्वल कारकून : ४ अव्वल कारकून ते मंडल अधिकारी : ५ मंडल अधिकारी संवर्गातील अव्वल कारकूनांना कार्यकाळ संपल्याने मूळ मंडल अधिकारी पदावर बदली : ३ वाहनचालक : ७
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.