आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शाल्मली क्षत्रियने नाबाद 68 धावा व 1 बळी या आपल्या अष्टपैलू खेळाने, ईश्वरी सावकार च्या नेतृत्वाखाली खेळत बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील 19 वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राला उपान्त्य फेरी गाठण्यात मोठा वाटा उचलला. पुदूचेरी येथे उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने दिल्लीवर 66 धावांनी विजय मिळवला.
उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण २१ व्या षटकात महाराष्ट्राची 6 बाद 46 अशी स्थिती झाली. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत शाल्मली क्षत्रियने 11 चौकरांसह 87 चेंडूत नाबाद 68 धावांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान देत संघाच्या धावा 168 वर नेताना उत्कृष्ट जबाबदार फलंदाजीचे दर्शन घडवले.
गोलंदाजीत ही काटकसरीने 8 षटकांत 3 निर्धाव टाकत व केवळ 17 धावा देत 1 गडी बाद केला. 7 बाद 59 व 8 बाद 106 अशा अवस्थेतून महाराष्ट्र संघाला सावरत, नाबाद 68 धावांची खेळी करत 168 पर्यंत धावसंख्या नेणारी शाल्मलीची खेळी विजयी ठरली. साखळीत देखील पंजाब वरील विजयात आपल्या जलदगती गोलंदाजीची चुणूक दाखवत शाल्मलीने पंजाबचे ३ गडी बाद केले होते.
उपान्त्य फेरीत मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा सामना पुदूचेरी येथे 21 डिसेंबर ला होणार आहे. शाल्मली क्षत्रियच्या या विजयी अष्टपैलू कामगिरीने नाशिक क्रिकेट वर्तुळात व खास करून महिला क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये ,अतिशय उत्साहाचे व आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी शाल्मलीला शाबासकी देत खास अभिनंदन करून पुढील उपान्त्य फेरीच्या सामन्यासाठी ईश्वरी व शाल्मलीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.