आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाची बातमी:29 एकरवरील नाशिकचे आकर्षण पुन्हा सुरू होणार ; फाळके स्मारक उद्यानाचे दरवाजे पुन्हा उघडणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

29 एकर जागेवरील फाळके स्मारकाची दुरवस्था थांबवण्यासाठी हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर प्रशासक रमेश पवार यांनी स्वनिधीतून फाळके स्मारकाच्या परिस्थितीत थोडी सुधारणा करून फाळके स्मारक येत्या दोन दिवसात नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.

पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी 29 एकर जागेत 1999 मध्ये महापालिकेने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली होती. त्या काळात हा प्रकल्प संपूर्ण राज्याचे आकर्षण ठरले होते. खास करून मुंबई नाशिकच्या वेशीवर हा प्रकल्प असल्यामुळे राज्यभरात महती पसरली.

सुरुवातीला हा प्रकल्प नवीन असल्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली तसेच सर्व सुविधा नवीन असल्यामुळे फारशा अडचणी आल्या नाही. मात्र त्यानंतर देखभाल-दुरुस्ती वरील खर्च वाढत वाढत गेल्यामुळे तसेच उत्पन्न घटू लागल्यामुळे प्रकल्पाची दुरावस्था झाली. या प्रकल्पाच्या देखभाल-दुरूस्तीवर आजवर साडेदहा कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.

तत्कालिन आयुक्त कैलास जाधव यांनी पीपीपी तत्वावर हा प्रकल्प चालवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये महापालिकेचे नुकसान होणार असल्याचे लक्षात आल्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत महापालिकेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प विकसित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकल्पातील किरकोळ दुरूस्तीची कामे पुर्ण करण्यात आली असून येत्या दोन दिवसांमध्ये फाळके स्मारक नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. आयुक्त पवार यांनी नुकताच आढावा घेतला असून स्मारकातील बहुचर्चित कृत्रिम धबधबा आणि कारंजे सुरू करण्यात आले आहे.

पुनर्विकास होणार

हा प्रकल्प यशस्वीपणे सुरु झाल्यास केवळ महापालिकेला उत्पन्नातच फायदा होणार नाही तर नाशिककरांना विरंगुळ्यासाठी तसेच मनोरंजनासाठी एक मोठे केंद्र निर्माण होणार आहे. त्यामुळेच आयुक्त पवार यांनी हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या प्रकल्पाचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प नेमका कसा करायचा यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसात यासाठी स्वारस्य देकार मागविले जाणार आहेत. या प्रकल्पा लगत असलेल्या वॉटर पार्कचा विकास मात्र पीपीपी तत्वावर केला जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा जारी केल्या जाणार असून दहा वर्षे मुदतीकरीता हा ठेका दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...