आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या मास्टर मॉल अनाधिकृत बांधकाम:धोकादायक इमारत म्हणून पालिकेकडून नोटीस; बांधकामामुळेच आग लागल्याची माहिती

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अत्यंत मध्यवस्ती व गजबलेल्या ठिकाणी असलेल्या गंजमाळ येथील मास्टर माॅल जरी आगीत भस्मसात झाला असला तरी, त्यामागचे नेमके कारण शाेधण्यासाठी पालिकेने नेमलेल्या चाैकशी समितीच्या पाहाणीत याठिकाणी अनाधिकृत बांधकाम तसेच वापरातही बदल केल्याचे आढळले आहे. त्यामुळे येथील आग विझवणे अवघड ठरल्याचेही स्पष्ट झाले असून याठिकाणी माेठ्या प्रमाणात फर्निचरची दुकाने असल्यामुळे हीच आग जर पसरली असती तर माेठी वित्तहानी हाेवू शकली असेही पुढे आले आहे. दरम्यान, आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी त्याची गंभीर दखल घेत या माॅलला धाेकादायक व अनाधिकृत घोषीत केले आहे.

गेल्या रविवारी गंजमाळ येथील इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांशीसंबधित माॅलला लागलेली आग विझवता विझवता पालिकेला नाकीनऊ आले. याठिकाणी अनाधिकृत शेड असल्यामुळे पालिकेची काेंडी झाली. आग विझवण्यासाठी थेट भिंतींना भगदाड पाडावे लागले हाेते. याठिकाणी फर्निचर व अन्य दुकाने असल्यामुळे आग पसरून माेठी वित्तहानी हाेवू शकली असती. तसेच याठिकाणी दाटीवाटीने वसलेली माेठी वसाहत असून येथे आग लागली असती तर अक्षरश: हाहाकर उडाला असता. ही बाब लक्षात घेत मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्रत्यक्ष पाहाणी करून नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांना चौकशीचे आदेश दिले होते.

मंजुर आराखड्यापेक्षा भलतेच बांधकाम

नगररचना विभागाने मंजुर केलेल्या प्लॅनपेक्षा वेगळ्याचपद्धतीने याठिकाणी बांधकामच झाल्याचे समाेर आले. हॉलच्या जागेचा वापर गोडावूनसाठी केल्याची गंभीर बाब पुढे आली. येथील शेडदेखील अनधिकृत असल्याचे आढळून आल्याने नगररचना विभागाने मॉलला धोकादायक घोषीत केलेच शिवाय इमारतही अनधिकृत ठरवून बांधकाम हटविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या पाहाणीनंतर अग्रवाल यांनी संबंधीत इमारत धोकादायक आणि अनधिकृत असल्याचे लक्षात आल्यामुळे संबंधितांना नोटीस दिली आहे. इमारत हटविण्यास सांगितले असून त्यानुसार कारवाई न झाल्यास पालिका स्वयंपुर्तीने हटवणार आहे.

कठाेर कारवाई हाेणार

अनाधिकृत बांधकामामुळे मास्टर माॅलला आग लागली असून ही आग पसरली असती तर माेठी वित्तहानी व जीवीतहानीही हाेवू शकली असती. इमारतीत वारा येण्यासाठी जागाच साेडली गेली नसल्यामुळे आग आटाेक्यात आली नाही. इमारतील मंजुर बांधकामापेक्षा वेगळेच काम केल्याचे आढळले असून त्यामुळे चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल. असे मनपा आयुक्त रमेश पवार यांनपी म्हटले आहे.