आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकत्याच रोहा येथे पार पडलेल्या 48 व्या कुमार आणि मुली यांच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत नाशिकच्या झुंजार मुलींनी सलग दुसऱ्या वर्षी उपविजेते पदाला गवसणी घातली. या स्पर्धेतून प. बंगाल येथे 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी " संस्कृती " नाशिकच्या तीन खेळाडूंची राज्याच्या मुलींच्या खो - खो संघात निवड झाली आहे.
अंतिम फेरीत पाच गडी बाद करणारी व स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमकाचा पुरस्कार विजेती दिदी ठाकरे, आपल्या शांत आक्रमणा साठी प्रसिध्द असणारी वृषाली भोये हि राज्याच्या मुलींच्या संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड होणारी नाशिकची पाहिली खेळाडू आहे. या वर्षी नुकत्याच उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिने भारतीय विमान प्राधिकरण यांचे प्रतिनिधीत्व करतांना उप विजेते पदाला गवसणी घातली होती.
एकाच वर्षांत महिलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारी वृषाली हि नाशिकची पहिली खेळाडू आहे. 14 वर्षा खालील गटात एकाच वर्षांत दोन राष्ट्रीय स्पर्धा खेळणारी आणि गतवर्षी राज्याच्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या सोनाली पवार हिने आपल्या अष्टपैलू खेळाने यंदा राज्याच्या संघात स्थान पटकाविले.
या तिन्ही खेळाडू श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी येथे शिक्षण घेत असून त्यांना गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे वर्षभर सकाळ - सायंकाळ त्या नियमीत सराव करत असतात. त्यांच्या निवडी बद्दल जिल्हा खो - खो असो.अध्यक्ष विश्वास ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे,'संस्कृती' नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड आणि जिल्हा खो- खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.