आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NMMSपरीक्षेत यावर्षापासून महत्वपूर्ण बदल:उत्पन्नाची मर्यादा आता 3.50 लाखांपर्यंत, यंदा तब्बल 1 लाख 97 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर एनएमएमएस ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी यंदा महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून आता परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाखांहून साडेतीन लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्पन्न मर्यादा वाढल्यामुळे यंदाच्या वर्षी होणाऱ्या या परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही तब्बल 67 हजारांची वाढ झाली असून महाराष्ट्रातून तब्बल 1 लाख 97 हजार 169 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केल्यानंतर 18 ऐवजी बुधवार दि. 21 डिसेंबला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर होईल.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्ती दिली जाते. राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे आयोजन केले जाते. शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी ज्या पालकांचे उत्पन्न यापूर्वी दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्या पाल्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ होण्याची संधी मिळत होती.

यंदाच्या वर्षापासून पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली असून साडेतीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांनाही परीक्षेला प्रविष्ठ होता येईल. गेल्या वर्षी राज्यात 1 लाख 30 हजार 504 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यंदा विद्यार्थी संख्येत 67 हजारांनी वाढ झाली असून 1 लाख 97 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

चार वर्ष मिळणार शिष्यवृत्ती

एनएमएमएस परीक्षेद्वारे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अशी होईल परीक्षा

शिष्यवृत्ती परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार होईल. त्यातून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र ठरतील. राज्यातून 11 हजार 760 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी 90 प्रश्नांसाठी 90 गुण असे एकूण 180 गुण असतील. मराठीसह इतर सात भाषांमध्ये परीक्षा होईल.

  • जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची संख्या व विद्यार्थी संख्या
  • 19- परीक्षा केंद्र
  • 6500- विद्यार्थी संख्या
  • 563- राज्यातील परीक्षा केंद्रांची संख्या
  • 197169- राज्यभरातील विद्यार्थ्यांची संख्या
बातम्या आणखी आहेत...