आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. बी. स्टार लक्षवेधी:खड्ड्यांमुळे नवी डोकेदुखी; टायर फाटले, क्लेम वाढले, व्हील बॅलन्सिंग सेटिंग, अलाइनमेंटचा वेगळा भुर्दंड

जहीर शेख | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती मलमपट्टी केलेले रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. हे खड्डे नागरिकांच्या जिवाला घातक ठरू लागले आहेत. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फाटणे, फुटण्याच्या व वाहने नादुरुस्त हाेण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी ‘रस्त्यांवरील खड्डे झाले उदंड, वाहनमालकांच्या खिशाला टायर व व्हील बॅलन्सिंगसह अलाइनमेंटचा अधिकचा भुर्दंड’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या काही दिवसांत शहरात शंभरावर टायर फुटण्याच्या घटना घडल्याचे समाेर आले आहे.

जाेरदार सुरू असलेल्या पावसामुळे शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच काहींची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. तर ज्यांची कामे झाली त्यांचा दर्जा पावसाने उघड केला आहे. निकृष्ट कामांमुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. काहींची अवस्था इतकी बिकट झाली आहे की एक खड्डा चुकवला की दुसऱ्या खड्ड्यात वाहन हमखास आदळते. चारचाकी वाहनांचे टायर लवकर खराब हाेत आहेत.

त्यातच खड्ड्यांतील खडीचा कट लागल्याने टायर फुटत असल्याने नागरिकांच्या जिवाला धाेका निर्माण हाेत आहे. दुचाकीचालकांना तर जिवावर उदार हाेऊनच वाहन चालवावे लागत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चारचाकी वाहनांची स्प्रिंग तुटणे, आसनव्यवस्था खराब हाेणे, सस्पेन्शन खराब हाेणे आदी समस्या निर्माण हाेत आहेत. या समस्यांना नागरिक वैतागले असून महापालिका प्रशासनाने त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे.

व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग सेटिंगमध्ये बदल : खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांच्या व्हील अलाइनमेंट सेटिंगमध्ये अडचण होत आहे. त्यामुळे टायर लवकर खराब होतात. त्याबरोबरच गाडीचे सस्पेन्शनचे आयुष्यही १० ते १५ हजार किलोमीटरने कमी होते. कोणत्याही वाहनांचा टायर ३० हजार किमी चालतो. मात्र, या टायरची नीट काळजी न घेतल्यास प्रवासावेळी टायर फुटणे, पंक्चर होणे, अवेळी झीज झाल्याने ब्रेक न लागणे अशा घटना घडतात.

यासाठी वेळोवेळी टायर अदलाबदली, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग करणे गरजेचे असल्याचे टायरविक्रेत्यांकडून सांगण्यात आले. मात्र, खड्ड्यांमुळे टायरचे नुकसान हाेत असल्याने ते लवकर खराब हाेत आहेत. तसेच व्हील अलाइनमेंट करूनही वारंवार बिघाड हाेत असल्याने ती दुरुस्ती करण्यासाठी वाहनधारकांना पुन्हा पुन्हा खर्च करावा लागत असल्याने ते वैतागले आहेत.

या ठिकाणची वाट बिकट
सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नल, चांडक सर्कल परिसर, भाभानगर, द्वारका भागातील सारडा सर्कलकडे जाणारे रस्ते, मुंबईनाका परिसरातील सर्व्हिसराेड, एसएसके हॉटेलकडे जाणारे रस्ते, गडकरी चौकापासून ते शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावरही माेठमाेठे खड्डे पडले आहे. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गाचीही अनेक ठिकाणी चाळण झाली आहे.

आठवड्यात एका दुकानात ५० क्लेम
शहरातील वेगवेगळया भागात असलेल्या टायरच्या दुकानात वॉरंटीत असलेले दररोज शेकडो फुटलेले टायर्सचे क्लेम येत आहे. एका दुकानात आठवडाभरात किमान ५० टायर येत असल्याची माहिती एका टायरविक्रेत्याने दिली.

रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी
गणेशोत्सवामुळे महापालिकेकडून शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र, हे काम करताना मातीमिश्रित मुरुमाचा वापर केल्यानेे पावसामुळे माती वाहून गेल्याने पुन्हा खड्डे निर्माण झाले तर मुरूम रस्त्यावर पसरला आहे. परिणामी दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वाॅरंटीतील टायर बदलण्याच्या क्लेममध्ये वाढ
शहरात व महामार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे टायर फुटणे, टायरमध्ये बब्लस येणे अशा समस्या येत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एक वर्षाच्या आतील वाॅरंटीमधील टायर क्लेमसाठी येत आहेत. आठवडाभरात साधारण ५० टायर येत आहेत.- विशाल पिचा, मालक, टायर स्टेशन

खड्ड्यांमुळे सहा महिन्यांतच फुटले नवीन टायर
सहा महिन्यांपूर्वीच गाडीला नवीन टायर बसविले हाेते. मात्र, खड्ड्यांमुळे टायरला कट बसत असल्याने तो अचानक फुटला. टायर वॉरंटीमध्ये होता म्हणून आता बदलून मिळाला आहे. मात्र, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग सेटिंग पूर्ण बिघडली आहे. त्यासाठी माेठा आर्थिक भुर्दंड साेसावा लागणार आहे.- सागर बेदरकर, वाहनचालक

बातम्या आणखी आहेत...