आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंडी फुटणार:इंदिरानगरला नवा बोगदा, राणेनगरसह सध्याच्या बोगद्याची लांबी वाढणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्यांच्या परिसरातील दररोजची वाहतूककोंडी फोडण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल सव्वाशे कोटीचा प्रस्ताव तातडीने मंजूर केला आहे. त्यानुसार आता इंदिरानगर येथे सध्याच्या बोगद्याजवळच आणखी स्वतंत्र एक बोगदा (अंडरपास) तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत सध्याचा इंदिरानगर बोगदा आणि राणेनगर बोगदा येथील बोगद्यांची लांबी दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेसात मीटर एवढी वाढविण्यात येणार असून त्याच्यावरूनच शहरातील वाहतुकीसाठी सध्याच्या उड्डाणपुलाला समांतर असे लहान उड्डाणपूलही उभारण्यात येतील.

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली इंदिरानगर व राणेनगर येथे असलेल्या बोगद्यांच्या परिसरात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. अनेक रस्ते येथे एकमेकांना छेद देत असल्याने जणू वाहतुकीचा चक्रव्यूहच भेदत वाहनधारकांना पुढे सरकावे लागते. वाहतूक काेंडीची ही जटिल समस्या सोडविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत असून त्याबाबत वेळोवेळी निदर्शने, आंदोलनेही झाली आहेत.

खा. हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्ताव देत पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी दोन्ही प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा करत तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.

नव्या प्रस्तावानुसार आता सध्याच्या इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांची लांबी दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेसात मीटर म्हणजे १५ मीटरने वाढविण्यात येईल. परिणामी सध्याच्या २५ मीटर ऐवजी ही लांबी ४० मीटर होईल. म्हणजेच दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड देखील आता बोगद्यांनी बंदिस्त होतील आणि त्यावरून शहरातील वाहतुकीसाठी सध्याच्या उड्डाणपुलास समांतर असे छोटे उड्डाणूल साकारण्यात येतील.

जेणेकरून सध्या एकमेकांना छेद जाणाऱ्या रस्त्यांमुळे वाहतुकीला येणारी बाधा थेटपणे टाळली जाईल. त्यासोबतच इंदिरानगर बोगद्याजवळ मुंबई नाक्याच्या बाजूने काही अंतरावर तेवढाच आणखी एक स्वतंत्र बोगदा निर्माण करण्यात येईल.यामुळे इंदिरानगर तसेच गोविंदनगरकडे जाण्यायेण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे अस्तित्वात येतील. यातून वाहतूक काेंडीची समस्या सुटण्यास मदत हाेईल.

महामार्ग प्राधिकरणाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश
इंदिरानगर व राणेनगर बोगदा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने आपण एनएचएआयकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्यानुसार दोन्ही ठिकाणची समस्या मार्गी लागण्यासाठी एनएचएआय़तर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याच्या मान्यतेची घोषणा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केल्याने सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. - खा. हेमंत गोडसे

बॉक्स पुशिंग तंत्रज्ञान वापरासाठी प्रयत्नशील
इंदिरानगर तसेच राणेनगर येथील बोगद्यांची लांबी वाढविण्याचे काम सुरू होईल तेव्हा त्यासाठी अत्याधुनिक अशी बॉक्स पुशिंग तंत्रज्ञान वापरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरू असतानाच बाेगद्याची लांबी वाढविण्याचे काम करणे शक्य हाेणार आहे. नव्या प्रस्तावानुसार इंदिरानगर येथे होऊ घातलेल्या आणखी एका नव्या बोगद्याचे कामही यानुसार होईल, अशी अपेक्षा आहे. - दिलीप पाटील, प्रबंधक (तांत्रिक), राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

बातम्या आणखी आहेत...