आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप vs शिवसेना:शिवसेना-भाजपमधील पारंपरिक मैत्रीची अखेरची धुगधुगही थंडावली, जनआशीर्वाद यात्रा रोखून महाविकास आघाडीचे मोदींना आव्हान

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रमोद महाजनांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात उमललेल्या शिवसेना-भाजप युतीचे ‘कमळ’ आता पूर्णपणे कोमेजले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये पडलेली दरी राणेंच्या अटकेनंतर आणखीच रुंदावली आहे. राणेंच्या अटकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाने सुरू झालेली जनआशीर्वाद यात्रा रोखण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. शिवाय राणेंच्या आडून शिवसेनेला अंगावर घेऊ पाहणाऱ्या भाजपला शिवसेना “स्टाइल’नेच शिंगावर घेण्यात आले आहे. केंद्रीय मंंत्री व शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांच्या नेतृत्वात मुंबईहून जनआशीर्वाद यात्रा सुरू करून भाजपने शिवसेना विरुद्ध राणे असा डाव मांडला होता. यात्रेच्या पहिल्या दिवसापासून राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सुरू केले होते. मात्र, त्यांच्या महाडमधील वक्तव्याची संधी साधून आघाडी सरकारने यात्रा रोखल्याने शिवसेना-भाजप मैत्रीची शक्यता तूर्तास संपुष्टात आली आहे. राणेंच्या अटकेच्या अनुषंगाने नाशिक, मुंबई, सांगली यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये शिवसैनिक विरुद्ध भाजप कार्यकर्ते यांच्यात सुरू झालेले राडे आगामी निवडणुकीची नांदी ठरली आहे.

मैत्रीपूर्ण वक्तव्ये विरली
राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर दाखल गुन्ह्यांनंतर भाजपसोबत जुळवून घेण्याबाबतची शक्यता शिवसेना व राष्ट्रवादीच्या गोटातून पुढे येत होती. मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांची दिल्ली भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींसोबत झालेली “गोपनीय’ चर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केलेली “मैत्रीपूर्ण’ वक्तव्ये या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत सुरू असलेली सेना-भाजप मैत्रीची धुगधुगही कायमची थंडावली आहे.

बातम्या आणखी आहेत...