आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल ते आयटीआय सिग्नलपर्यंतच्या रस्त्यावर रोज रात्री ७ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत आईस्क्रीम विक्रेत्यांसह इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या असतात. ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी या ठिकाणी वाहनांच्या रांगाच भररस्त्यात उभ्या रहात असल्याने निम्म्याहून जास्त रस्ता त्या व्यापतात आणि वाहतूक काेंडी होते. यामुळे या भागात रोजच लहान-मोठे अपघात होत आहेत. मात्र गंगापूर पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची ‘अर्थ’पूर्ण भूमिका चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीच या चौकात अपघात होऊन निष्पाप बालकाचा जीव गेला. तरी पोलिस यंत्रणा आणखी किती अपघातांची वाट बघणार? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
त्र्यंबकरोडवर रात्री नियमितपणे एबीबी चौकातच सातपूरच्या दिशेला विकास कॉलनीलगतच्या रस्त्यावर खाद्यपदार्थ, आईस्क्रीम विक्रेत्यांची रांगच लागलेली दिसते. या विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच विक्री सुरू केल्याने येणारे ग्राहकही कुटुंबियांसह खाद्यपदार्थ घेण्यासाठी आल्यावर त्यांची वाहनेदेखील रस्त्यावरच उभी केली जात असल्याने हा रस्ता निम्म्याहून अधिक जागा हीच वाहने व्यापून टाकतात. त्यामुळे नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांसह बसेस, भाजीपाल्याची वाहने, औद्योगिक वसाहतीत जाणारे ट्रक याच मार्गावरून जात असताना त्यांना अडथळा निर्माण होतो. याच रस्त्यावरून नाशिकरोड, इंदिरानगरकडून गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉलवरून सातपूर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या वाहनचालकांना देखील मार्गक्रमण करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच एबीबी चौकात चारही बाजूला वाहने उभे रहात असल्याने दुचाकीचालकांना रस्ता ओलांडणेही मुश्कील होते. अशातच या ठिकाणी रोज छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत असतात.
त्यातच, गेल्या महिन्यात रात्रीच्या सुमारास भरधाव आलेल्या कारने पुढच्या कारला धडक मारल्याने झालेल्या अपघातात निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोन-तीन दिवस सर्कलवरील खाद्यपदार्थ विक्रेते बंद ठेवण्यात आले, आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंगापूर पोलिसांची याच ठिकाणी नियमित ‘हजेरी’ कोरोनासारख्या महामारीच्या काळात सर्व दुकाने बंद असतानादेखील याच सर्कलवरील हातगाड्यांवरील विक्रेते सुरू असायचे. त्यापाठाेपाठ आता इतर हॉटेल्स, रेस्टॉरंट, किराणा मालाची दुकाने असो की भाजीपाला विक्रेत्यांना वेळीच रात्री १० वाजता बंद करण्यास पोलिस भाग पाडतात. मात्र, या चौकात गंगापूर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल, गुन्हा शोधपथकाचे कर्मचारी नियमित रात्री १० ते ११ वाजता गर्दी झाल्यास चक्कर मारतात. जोरजोरात सायरन, शिट्ट्या वाजवून निघून जातात. पुढे जाऊन पुन्हा मागे येऊन पाच मिनिटात हजेरी लावल्यासारखे निघून जातात. परंत, एकही विक्रेता हटत नाही की ग्राहकांची वाहने, यावरूनच पोलिसांचे आणि विक्रेत्यांचे संबंध बघून सर्वांनाच आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे, काही जागरूक नागरिक हमखास गंगापूर पोलिस ठाण्याच्या क्रमांकावर कॉल करतात, रात्री या चौकात खूप गर्दी झाली आहे, वाहने जाण्यासही जागा नाही, अशी तक्रार करतात. तिकडून लागलीच उत्तर येते अहो गाडी तिकडेच गेली आहे, बीट मार्शल पाठवतो, असे म्हणत फाेन ठेवला जाते. पण पुढे काहीच होत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.