आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी, अमित शहांवर अप्रत्यक्ष निशाणा:नितीन गडकरी हे व्हिजन असलेले देशातील सर्वोच्च नेतृत्व ; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

सिन्नर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचंड व्हिजन व विकासाचा ध्यास असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विकासाची घोडदौड सुरू आहे. देशातील सर्वोच्च नेतृत्व आजघडीला जर कोणी असेल तर ते नितीनजी गडकरी आहेत, असे प्रशंसनीय उद्गार भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काढले. नांदूरशिंगोटे येथील गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

गडकरी यांचा सर्वोच्च नेता असा उल्लेख करत त्यांनी एक प्रकारे नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावरील नाराजी अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिली. आपल्या प्रत्येक पत्राला त्यांनी प्राधान्य देऊन विकासकामांसाठी निधी दिला. मुंडे साहेब प्रचंड आक्रमक होते. तो आक्रमकपणा माझ्यातही आहे. मात्र, त्यावर आता झाकण ठेवलंय. योग्य वेळी ते झाकण काढून आक्रमकपणा दाखवून देऊ, असा गर्भित इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगरात मुंडेंचे स्मारक नको, रुग्णालय उभारा २०१४ सालापासून राज्य सरकार छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंडे साहेबांचे स्मारक बांधणार होते. २०२४ च्या निवडणुका जवळ आल्या तरी ते झालं नाही. शासनाने आता साहेबांचे स्मारक उभारू नये. लोकांना आता स्मारक उभारण्यासाठी शासनाच्या पैशाची गरज नाही. लोकवर्गणीतून जनता साहेबांचे पुतळे उभारत आहेत, असे सांगून पंकजा मुंडे यांनी लोकनेते मुंडे यांचे स्मारक उभारण्यात शासनाकडून झालेली दिरंगाई उपस्थित नेत्यांच्या आणि जनतेच्या लक्षात आणून दिली. स्मारकाऐवजी शासनाने गरिबांच्या मुलांसाठी वसतिगृहे, गरजूंसाठी हॉस्पिटल्स बांधावेत, असेही पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले.

भाजपचा प्रभाव मोठा करण्याचे श्रेय मुंडेंचे : मंत्री गडकरी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला जनतेचा पक्ष केले. राज्यात भाजपचा प्रभाव मोठे करण्याचे श्रेय मुंडेंचे असून त्यांच्यासारख्या नेत्यांनी पायाभरणी केल्याने आजची भाजपची इमारत उभी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपचा अध्यक्ष झाल्यावर दिल्लीत एका कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी आणि मुंडे यांना मी वाकून नमस्कार केला. मुंडे यांनी आपल्याला वाकून नमस्कार न करण्याबद्दल सांगितले. मात्र, अध्यक्ष झालो असलो तरी मुंडे हे माझे नेते होते.

बातम्या आणखी आहेत...