आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी-माजी आमदारांतील श्रेयवाद:ना बस, ना स्थानक; धुणी-भांड्यांसाठी 3 कोटी खर्च अन् 3 वेळा भूमिपूजन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ना बस, ना स्थानक; मात्र धुणी-भांड्यांसाठी, गुरे बांधण्यासाठी वा वाहने लावण्यासाठी हक्काची जागा म्हणजे सातपूरचे रखडलेले बसस्थानक. आजी-माजी आमदारांतील श्रेयवाद आणि कामाच्या निकृष्ट दर्जामुळे गेल्या नऊ वर्षांपासून तीन वेळा भूमिपूजन होऊनही हे स्थानक अजूनही अपूर्णावस्थेतच आहे. सुरुवातीचा ९० लाख रुपयांचा खर्च आता साडेतीन कोटींवर गेला आहे. या एकूणच परिस्थितीमुळे प्रवाशांना मात्र उन्हातान्हात, घाणीत, रस्त्यावरच उभे रहावे लागत आहे. दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार १०० टक्के काम पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात जागेवर काम अर्धवटच आहे.

किमान १० वेळा दिले निवेदन

  • यांनी दिले निवेदन : ज्येष्ठ नागरिक नरेंद्र पुणतांबेकर, महादेवनगर जनसेवक समितीचे अध्यक्ष विजय अहिरे यांच्यासह अनेकांनी निवेदने दिली आहेत.
  • यांना दिले निवेदन : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्री अजित पवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नेत्यांकडेही किमान १० वेळा निवेदने दिली आहेत.

एसीपी पॅनल रद्द
स्थानकाच्या दर्शनी भागात लावण्यात येणारे फॅब्रिकेट अॅक्रॅलिक अॅल्युमिनियम अर्थात एसीपी पॅनलही रद्द करण्यात आले आहे. सन २०१५मध्ये वर्क ऑर्डर मिळाली, तेव्हाही भूमिपूजन करण्यात आले. ती जागा एमआयडीसीची होती ती महामंडळाला हस्तांतरित करण्याचा विषय झाला. त्यावर काही कर होते ते कोणी भरायचे असाही प्रश्न यावेळी निर्माण झाला होता.

सद्यस्थिती अशी...
सध्या प्रवासी रस्त्यावरच उभे राहतात. बसस्थानकात धुणी-भांडी केलेली दिसतात. नागरिकांसाठी हक्काचे वाहनतळ झाले आहे. परिसरात प्रचंड घाण आणि दुर्गंधी आहे.

असे बदलले ठेकेदार
या कामासाठी चार ठेकेदार बदलण्यात आले. प्रभाकर पाटील, प्रतीक बडगुजर व महालक्ष्मी मजूर सहकारी संस्था यांच्याकडे ठेका होता. आता चौथ्या ठेकेदारासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

लोकप्रतिनिधींची केवळ उदासीनता
गेल्या नऊ वर्षांपासून त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांपासून ते आताचे खासदार गोडसे, आमदार हिरे यांच्याकडे अनेक निवेदने दिली. मात्र या लोकप्रतिनिधींच्या केवळ उदासीनतेमुळे आजही बसस्थानकाचे काम खितपत पडले आहे. त्याचा बांधकाम खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. - नरेंद्र पुणतांबेकर, ज्येष्ठ नागरिक

बातम्या आणखी आहेत...