आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आता 1209 आजारांवर हाेणार मोफत उपचार; लाभार्थ्यांना रुपये पाच लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागांमार्फत आयुष्मान भारतचे इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढण्यासाठी पुढील १५ दिवस विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या इ-कार्डच्या माध्यमातून १ हजार २०९ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार असल्याने नागरिकांनी मोफत इ-कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी केले आहे.

‘आयुष्मान भारत’ योजनेत पात्र लाभार्थ्यांना रुपये पाच लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते. या योजनेंतर्गत इ-कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्मान भारतचे पत्र, रेशनकार्ड किंवा आधारकार्ड ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे.

त्याचप्रमाणे स्वतःचा मोबाइल क्रमांक जवळ ठेवून त्यावर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करतेवेळी देण्यात यावा, जेणेकरून इ-कार्ड त्वरित तयार होऊन विनामूल्य उपलब्ध होईल. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे पैशांची मागणी केल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात तक्रार करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून या योजनेसाठी १६ लाख ७ हजार १४४ लाभार्थी पात्र ठरले असून २३ सप्टेंबर, २०१८ पासून आजपर्यंत साधारण चार लाख ९० हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढले आहे. त्यापैकी जिल्ह्यातील तीन लाख ७१ हजार ७२७ लाभार्थ्यांनी ही योजना सुरू झाल्यापासून लाभ घेतला आहे.

त्यासाठी ७८६ कोटी १४ लाख २१ हजार ७०८ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आयुष्मान भारत इ-कार्डसाठी नोंदणी करून मोफत इ-कार्ड काढावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात ‘आयुष्मान’
१५ दिवस चालणार विशेष मोहीम.
१६ लाख ७ हजार १४४

जिल्ह्यांत लाभार्थी.
४ लाख ९० हजार लाभार्थ्यांनी घेतले गोल्डन कार्ड.
३ लाख ७१ हजार ७२७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
७८६ कोटी १४ लाख २१ हजारांवर झाला खर्च.
१ हजार २०९ आजारांवर करता येणार मोफत उपचार व शस्त्रक्रिया.
नागरिकांना त्यांच्या जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात जाऊन यासंदर्भात करता येणार नोंदणी.

बातम्या आणखी आहेत...