आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Offense Against The Contractor For Not Providing Footage Of The Warehouse Where The Voting Machine Was Kept; District Election Officer Complains Of Fraud| Nashik Marathi News

कारवाई:मतदान यंत्र ठेवलेल्या गोदामाचे फुटेज न दिल्याने ठेकेदारावर गुन्हा; फसवणूक झाल्याची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१९ मध्ये पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर गोदामात ठेवलेल्या इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनवर २४ तास सीसीटीव्हीच्या आधारे नजर ठेवून त्याचे रेकॉर्डिंग जतन करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करत संबंधित चित्रीकरण निवडणूक आयोगाकडे सादर न केल्याचा ठपका ठेवत या पुरवठादाराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीना सारंगधर आणि अक्षय सारंगधर असे या संशयित पुरवठादारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि नायब तहसीलदार राजेश आहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अंबड येथे केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक मतदान झाल्यानंतर इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सुरक्षित ठेवले. हा सर्व परिसर आणि गोदामावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट संशयित सारंगधर यांना दिले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गोदाम आणि परिसरातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग कायम जतन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संशयित पुरवठादाराला तेथील सर्व चित्रीकरण तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते.

मात्र संशयित पुरवठादाराने या सूचनांकडे दुर्लक्ष करत भारत सरकारच्या निवडणूकसंदर्भात महत्त्वाचे साहित्य दिले नाही. तसेच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन न करता हलगर्जीपणा करत शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली. संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...