आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका आयुक्तांचा दणका:सेवाज्येष्ठता यादीतील अधिकाऱ्यांना मिळणार संधी; मलईदार खुर्चीतील अधिकारी जाणार बॅक टू पॅव्हेलीयन

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार वर्षात महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लक्षात घेत मलईदार खुर्चीत सेवाज्येष्ठता डावलून दिलेल्या नियुक्त्या, पदाेन्नती वादात सापडल्या आहेत. आता आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सेवाज्येष्ठता यादीनुसार पदनिहाय पात्र अधिकारी काेण याचीच माहिती प्रशासन उपायुक्त मनाेज घाेडे पाटील यांच्याकडून मागवली आहे.

महापालिकेची जरी ‘ब’ वर्गात पदाेन्नती झाली असली तरी, अद्यापही ‘क’ वर्ग आकृतीबंधानुसारच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची 7082 पदे मंजुर असताना सध्यस्थितीत जेमतेम साडे चार हजार अधिकारी व कर्मचारीच कार्यरत आहेत.

रिक्त पदांचा फायदा घेत सेवाज्येष्ठता यादीला धाब्यावर बसून मागील काळात अनेक अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली गेली. या खुर्च्यांसाठी झालेले लक्ष्मीदर्शन तसेच अन्य शिष्टाचारही वादात हाेता. त्यामुळे हा द्रविडीप्राणायम न करू शकणाऱ्या शांत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. ही बाब लक्षात घेत आता आयुक्त डाॅ. पुलकुंडवार यांनी प्रशासकीय रचनेत शासन नियमानुसार कामकाज करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे लवकरच पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या किमान निवृत्त हाेण्यापुर्वी तरी चांगली खुर्ची मिळण्याची आशा पलल्वित झाल्या आहेत.

यांच्या खुर्च्या धाेक्यात

शहर अभियंतापदी शिवकुमार वंजारी यांना दिलेली पदाेन्नती वादात असून याठिकाणी सेवाज्येष्ठतेनुसार शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांची दावेदारी आहे. घनकचरा व्यवस्थापन संचालकपदीही सेवाज्येष्ठता यादीत दहापेक्षाही मागील स्थानावर असलेल्या डाॅ. आवेश पलाेड यांना नियुक्ती दिली आहे.

सर्वसाधारणपणे एका विभागात काम केल्यानंतर तेथे पुन्हा नियुक्ती देवू नये असा प्रघात असताना, संजय अग्रवाल यांना तर नगररचना विभागात तीनपेक्षा अधिक काळ नियुक्ती दिली आहे. नगररचना विभागात असताना थेट लाचलुचपत खात्याकडे तक्रार केल्यानंतरही बांधकाम विभागात दिलेली संदेश शिंदे यांची तसेच सचिन जाधव यांचीही पदाेन्नती वादात आहे. एकाच विभागात महत्वाची पदे भुषवणाऱ्यांनाही अन्य विभागातील खुर्चीत आयुक्त बसवतात का हे बघणे महत्वाचे आहे.

सेवाज्येष्ठता यादीची माहिती मागवली

''पालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे नियुक्ती दिली आहे का याबाबत माहिती मागवली आहे. प्रशासन उपायुक्तांना तसे आदेश दिले आहेत. एकाच विभागात पुन्हा पुन्हा काेणी कामकाज केले याची माहिती घेतली जात आहे.'' - डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा प्रशासक

बातम्या आणखी आहेत...