आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडीयावर काही अज्ञात संशयिताकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने शुक्रवारी हजारो युवकांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. संशयितावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी जमवाकडून करण्यात आल्याने बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत संशयितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
सोशल मीडीयावरील इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान केल्याचे वृत्त शुक्रवारी रात्री पसरताच जुने नाशिकसह नागजी,अशोकारोड,भारत नगर, पखालरोड, वडाळा रोड तसेच वडाळा गाव परिसरातील मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने शेकडोच्या संख्येने मुस्लिम तरुण भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले.यावेळी भद्रकाली पोलीस ठाणे ते मौला बाबा दर्गा चौकपर्यंत तर दुधबाजार ते हाजी दरबार हॉटेलपर्यंत जमाव दिसून येत होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनिल कडासने, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार,रियाज शेख,ईरफान शेख यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले.
यावेळी जमावाने घोषणाबाजी करत संशयितावर गुन्हा दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनिल कडासने, पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी उपस्थितांची समजूत काढली. संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच, सायबर क्राईम विभागास देखील त्वरित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली व सहाय्यक पोलिस निरीक्षक दानिश मन्सुरी यांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम केले.इंस्टाग्राम आय डी चा उल्लेख असलेला कारवाईसाठीच तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
मुंबई नाका,इंदिरानगर पोलिस ठाण्यात ही गर्दी
दरम्यान, नागजी,वडाळा रोड,भारत नगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल होत कारवाईची मागणी केली. तर वडाळा गावातील मुस्लिम बांधवांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गर्दी करत कारवाईची मागणी केली. या घटनेमुळे जुने नाशिकसह नागजी, वडाळारोड, पखालरोड, वडाळागाव भागात तणावाचे वातावरण पसरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.