आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • On The Verge Of Destruction Of Birth And Death Records And Records In The Old Building Of The Corporation; Modi Script Records From 1897 To 1933 Are Not Computerized | Nashik Marathi News

मनपाचे दुर्लक्ष:मनपाच्या जुन्या इमारतीत जन्म-मृत्यू नोंदणी व रेकॉर्ड नष्ट होण्याच्या मार्गावर ; 1897 ते 1933 चे मोडी लिपीचे रेकॉर्ड संगणकीकृत नाही

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी महापालिका असलेल्या मेनरोड येथील पूर्व विभागाच्या कार्यालयातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे रेकॉर्ड जीर्ण झाल्याचे चित्र आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदणी नष्ट होत असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहेत. १८९७ ते १९३३ पर्यंत सर्व नोंदी मोडी लिपीत आहेत. त्या नोंदींचे मराठी भाषेत रूपांतर व संगणकीकरण तसेच १९३४ ते १९७५ पर्यंतचे मराठीतील सर्व नोंदणी अद्याप संगणकीकृत करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे सर्व जुने रेकॉर्ड इमारतीत अगदी अडगळीत अस्ताव्यस्त पडले असून त्यातून अनेक महत्त्वाचे कागद बाहेर लोळत आहे.

शहरातील महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात जन्म व मृत्यूच्या १८९७ ते १९३३ पर्यंत ३७ वर्षांच्या नोंदी मोडी भाषेत आहेत. १९३४ ते १९७५ या ४२ वर्षांच्या नोंदी मराठी भाषेत आहेत. सध्या फक्त १९७६ ते सद्यस्थितीतील नोंदींचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, १९७५ अगोदरच्या नोंदींचे संगणकीकरण तसेच मोडी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करून त्यांचे संगणकीकरण केले जात नाही. जन्म-मृत्यूच्या नोंदी केवळ मोडी भाषेत असल्याने व मोडी भाषेची जाण संबंधित अधिकारी व सेवकांना नाही. परिणामी शहरातील नागरिकांना या कालावधीतील जन्म-मृत्यू दाखले दिले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे जन्म-मृत्यू नोंदींचे जतन, अनुवाद व संगणकीकरण करण्यासंदर्भात नागरिकांकडून मागणी आहे.

कोविडमुळे संगणकीकृत करणे थांबले
रेकॉर्ड संगणकीकृत करण्याचे काम कोरोनामुळे थांबविण्यात आले. काम पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न आहे. - स्वप्नील मुदळवाडकर, विभागीय अधिकारी

कामासाठी चकराच
आजोबांच्या मृत्यू दाखल्यांसाठी अर्ज केला होता. मात्र,रेकॉर्डच सापडत नसल्याने दोन महिने चकराही माराव्या लागल्या. - काझी सोहेल, नागरिक

..अशा आहेत नोंदी
१८९७ ते १९३३ पर्यंतची नोंदी मोडी लिपीत असून ३६ रजिस्टरमधील १३२० पाने मोडी लिपीत आहे. १९७६ ते २०२०च्या १ लाख ८० हजार ५० नोंदी संगणकीकृत आहे.

दाखल्यांसाठी वणवण
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर चौथ्या दिवशी जन्म किंवा मृत्यूचा दाखला मिळणे आवश्यक असते. मात्र, अद्याप नागरिकांना आठ-आठ दिवस हेलपाटे घालावे लागत आहे. महापालिकेकडे जन्म-मृत्यूच्या काही जुन्या नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही तर काही रेकॉर्ड नष्ट झाले आहे. त्यामुळेही बऱ्याचवेळा अडचण होते.

पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष...
महापालिकेच्या पूर्व विभागात ठेवण्यात आलेले जुने रेकॉर्ड नष्ट होण्याचे मार्गावर असून यासंदर्भात अखिल भारतीय सेवास्तंभ कर्मचारी महासंघाने आयुक्त कैलास जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून रेकॉर्ड जतन करण्य‍ाची मागणी केली आहे.मात्र, अद्याप जैसे थेच परिस्थिती आहे. - प्रकाश अहिरे, अध्यक्ष, अखिल भारतीय सेवास्तंभ कर्मचारी महासंघ

बातम्या आणखी आहेत...