आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी:कुसुमाग्रज प्रतिष्ठानची एक लाख रुपयांची अभ्यासवृत्ती यंदा प्रा. अविनाश काेल्हे यांना जाहीर

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी एक लाख रुपयांची अभ्यासवृत्ती देण्यात येते. यंदा या कुसुमाग्रज अभ्यासवृत्तीसाठी प्रा.अविनाश कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे, असे निवेदन अभ्यासवृत्ती समितीप्रमुख प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दिले आहे. यावर्षीच्या निवड प्रक्रियेत प्रतिष्ठानचे सल्लागार हेमंत टकले, विलास लोणारी, लोकेश शेवडे, अभ्यासक्रम समिती प्रमुख हर्षवर्धन कडेपूरकर, विश्वस्त अजय निकम व राजेंद्र डोखळे आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांचा सहभाग होता.

सर्जनशील लेखक

मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलेल्या अविनाश कोल्हे यांनी कथा व कादंबरी लेखनातून त्यांची सर्जनशीलता यापूर्वीच सिद्ध केलेली आहे. कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या सर्जनशील साहित्य निर्मितीला बळकटी प्राप्त होणार आहे.

हे आहेत मानकरी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने वर्षातून एकदा देण्यात येणारी अभ्यासवृत्तीचे यापूर्वी मुरलीधर खैरनार, अवधूत डोंगरे, प्रणव सखदेव, गजानन तायडे, ऋषीकेश पाळंदे आणि पंकज भोसले यांना देण्यात आली आहे. यातील काहींच्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत व काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. हे सर्व लेखक मराठी भाषेतील आजचे आघाडीचे लेखक आहेत.

अशी आहे अभ्यासवृत्ती

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मराठी भाषेतील कसदार सर्जनशील साहित्य निर्मितीला सहाय्यभूत ठरेल अशी एक लक्ष रुपये मूल्याची अभ्यासवृत्ती दिली जाते. या अभ्यासवृत्तीसाठी वयोमर्यादेची अट नसते. मात्र कालावधी एक वर्षासाठीचा असताे. इच्छुक अभ्यासकांनी अभ्यासाचा विषय, उदिष्टे, व्याप्ती आणि मर्यादा, ढोबळ आराखडा अपेक्षित फलनिष्पत्ती, मराठी भाषा व साहित्य यांच्या संवर्धनासाठी आपल्या अभ्यासाचे महत्व इत्यादी तपशिलासह स्वहस्ताक्षरात अर्ज दोन शिफारस पत्रांसह कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडे द्यायचे असतात. त्यानंतर समिती अभ्यासकरून अभ्यासवृत्ती जाहीर करते.

बातम्या आणखी आहेत...