आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांद्याचे आगार असलेल्या कळवण तालुक्यात या वर्षी कांद्याने शेतकऱ्यांचा वांधा केल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. महिनाभरापूर्वी चाळीत साठवलेला कांदा सडण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आणि बाजारभाव दिवसेंदिवस कोसळत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवड केली होती. जो यावर्षी लागवडीचा विक्रम होता. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, अशी परिस्थिती होती. मात्र, गेल्या चार महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे माेठे नुकसान झाले. याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी ७० टक्के उत्पादन मिळवले. चांगल्या प्रतीचा माल चाळीत साठवला. उर्वरित कांदा मिळेल त्या भावात विकला.
अवकाळी पावसाने नुकसान केल्याने कांद्याला तेजी राहील अशी अपेक्षा होती. यामुळे सध्या ८०० रुपये क्विंटल असलेला भाव महिन्यात दोन महिन्यांत वाढेल अशी परिस्थिती हाेती. मात्र, साठवलेला कांदा खराब हाेत आहे. शिवाय बाजारभाव नाही.
कांदा सडण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले, सध्या प्रत बघून २०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर
कांद्याची स्थिती वाईट, विक्री हाच पर्याय
चाळीत सडणारा कांदा विकण्याशिवाय पर्याय नसल्याने बाजारपेठा फुल्ल आहेत. याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. आवक वाढल्याने व कांदा टिकण्याची शक्यता नसल्याने २०० ते ९०० च्या घरात आहे. त्यातच व्यापारी वर्गाकडे कांदा ठेवायला जागा नसल्यामुळे मार्केट आठवड्यात तीन चार दिवस बंद ठेवले जाते. पणनची खरेदी बंदच
दरवर्षी एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला पणन महामंडळ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करायचे. यामुळे कांद्याचे बाजारभाव तेजीत असायचे. मात्र, यावर्षी सडणाऱ्या कांद्याच्या धास्तीने पणन महामंडळाकडून खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कुणीच वाली नसल्याची परिस्थिती आहे.
वातावरणाचा फटका
लागवडीनंतर किमान तीन ते चार वेळा अवकाळी पावसाने कांद्याला झोडपले. गेल्या पंधरवड्यापासून उष्णता वाढल्याने कांद्याला पोषक वातावरण मिळाले नाही. कांदा टिकण्याची शक्यता यावर्षी खूप कमी आहे.
महिनाभरात सडला कांदा
प्रत्येक वर्षी कांदा साठवतो. साठवलेला कांदा ऑक्टोबरपर्यंत सहज टिकायचा. यावर्षी महिन्याभरापूर्वी चाळीत टाकलेला कांदा ६० टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाला. अजून १५ दिवसांच्या आत नाही विकला तर १०० टक्के खराब होईल. -किरण बच्छाव, एकलहरे
दर्जेदार माल असूनही भाव नाही
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगल्या कांद्याला मागणी आहे. मात्र, सद्यःस्थितीत बाजारपेठेत त्या दर्जाचा माल ३० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. शिवाय बाजारभाव नाही. बांगलादेश, दुबई येथून मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात कांदा तेजीत येऊ शकतो. स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक जास्त व चांगला कांदा नसल्याने बाजारभाव नाहीत. -योगेश महाजन, व्यापारी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.