आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपासून आरसीएमएस प्रणालीत दोष:संथ रेशनकार्डची ऑनलाइन प्रणाली; दीड लाख लाभार्थ्यांची रिकामीच थैली

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी त्रस्त

शासनाच्या अन्न व नागरी विभागाच्या रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टिम म्हणजेच ‘आरसीएमएस' या ऑनलाइन प्रणालीचे काम दोन वर्षांपासून अतिशय संथगतीने होत आहे. या प्रणालीतील हे दाेष वारंवार सांगूनही शासनाच्या एनआयसी यंत्रणेकडून त्यात सुधारणा होत नसल्याने पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत. यामुळे २५ हजार नवीन रेशनकार्डचे फीडिंग रखडले असून नवीन रेशनकार्ड काढलेल्या किंवा रेशनकार्डात नव्याने नावे दाखल केलेले दीड लाखाहून अधिक लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित रहात आहेत.

आरसीएमएस ऑनलाइन प्रणालीवर नवीन रेशनकार्ड काढल्यानंतर त्याचे अपडेशन केले जाते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधारकार्ड लिंकिंग केल्यानंतर या रेशनकार्डला १२ अंकी नंबर प्राप्त होतो. त्यानंतर पात्र कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो. मात्र, गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून आरसीएमएस प्रणालीत दोष आढळून येत असून तहसीलस्तरावर अव्वल कारकुनासाठी एकच लॉगइन आयडी दिला जात असल्याने जिल्ह्यात दिवसभरात केवळ चार-पाच कार्ड ऑनलाइन होत आहेत. म्हणजेच दिवसभरात केवळ २० ते २५ माणसांचेच आधार लिंकिंग होत असल्याने पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. मागील वर्षापासून सुरू असलेल्या या कामांमुळे नागरिकांसह कर्मचारीही हैराण झाले असून यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही या आरसीएमएस प्रणालीत सुधारणा होत नसल्याने नागरिकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.

लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष; हजारो लाभार्थी वंचित
प्रत्येक तालुक्यातून पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आरसीएमएस प्रणालीसंदर्भात लेखी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या तक्रारी राज्याच्या संगणक विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दीड वर्षापासून हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित रहात आहे.

रेशनकार्ड मिळूनही दीड लाख लाभार्थी वंचित
रेशनकार्ड मिळूनही आजही दीड लाख नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. या नागरिकांना रेशनकार्ड देण्यात आले. परंतू, डाटा एन्ट्री न केल्याने या शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळू शकत नाही. यासंदर्भात आठ दिवसांत निर्णय न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल. लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घेऊन सामान्य नागरिकांना न्याय द्यावा.
- ऋषिकेश वर्मा, शिवसेना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ

शासनाला पत्र पाठवले
‘आरसीएमएस’ ऑनलाइन प्रणाली चालत नसल्याची माहिती शासनाला पत्राद्वारे दिली आहे. प्रणाली अतिशय संथगतीने चालत असल्याने यासंदर्भात काम सुरू असून पुढील आठवडाभरात ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.
- डॉ. अरविंद नरसीकर,जिल्हा पुरवठा अधिकारी

ओटीपी सेंड होत नाही, ३ तासांत एकच इंट्री
दिवसभरात कार्यालयात केवळ दोन किंवा तीनच डेटा फीडिंगचे काम होत असून तीन तासांत केवळ एक एंट्री होते. तर, Mahafood.gov.in या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टिममध्ये लॉगीन करताना बऱ्याचदा ओटीपी सेंड होत नाही. प्रक्रिया सुरू झाल्यावर आधार अपडेट होत नाही. आधार अपडेट झाले तरी १२ आकडी नंबर निघत नाही. वारंवार यूआयडी ऑथेंटिकेशन एरर असा मेसेज स्क्रीनवर दिसत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

ऑनलाइन फीडिंग होत नसल्याने कर्मचारी कमी
‘आरसीएमएस’ प्रणालीवर दिवसभरात दोन-तीन रेशनकार्डचे फीडिंग होत असल्याने ऑनलाइन फीडिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम ३१ मेपासून स्थगित करण्यात आल्याचे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरसीकर यांच्याकडून काढण्यात आले. यामुळे आता फीडिंगचे काम पूर्णपणे बंद झाल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...