आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत बसून पाक व्याप्त काश्मीर परत घेऊ असे म्हणतात मात्र, किती जागा घेतली हे केंद्र सरकार सांगत नाही. केंद्राला धड आपले काश्मीर सांभाळता येत नाही. पंडितांच्या हत्या सुरू आहे. गुजरातच्या निवडणुका झाल्याबरोबर चीनने घुसखोरी केली कशी हा माझा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की पुन्हा एकदा हिंदुस्तान पाकिस्तान सुरू होईल, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजपवर नाशिक येथील पत्रकार परिषदेमध्ये केली.
चीनला धडा शिकवणार का?
देशाच्या सीमेवर अशांतता आहे या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की नेपाळच्या नावाने काय बोलता? हिम्मत असेल तर चीनचे नाव घेऊन त्यांना धडा शिकवू असे पंतप्रधान व संरक्षण मंत्री का म्हणत नाही. चीनला का घाबरता असा सवाल करत लडाख, अरुणाचल प्रदेश इतर राज्याच्या सीमांमध्ये चीन घुसखोरी करत आहे. ते हल्ला करत आहे, त्यांच्या नकाशावर अरुणाचल प्रदेशाचे नाव घेतले जात आहे. राजकीय भाषणे खूप सोपी असतात. प्रत्येक गोष्टीचे खापर पंडित नेहरूंवर फोडणे ही एक फॅशन झाली आहे. तुम्ही काय केले ते सांगा, तुम्ही चीनला काय धडा शिकवला?
पुरस्कार घाईने काढणे अयोग्य
संजय राऊत म्हणाले, नक्षलवादाविरोधात शिवसेनेचा लढा सुरू आहे. कोबाड गांधी यांची मी अनेक पुस्तके वाचलेली आहेत. त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत असुच असे नाही. "फ्रॅक्चड फ्रिडम' या पुस्तकाच्या अनुवादाला पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार रद्द करण्याची गरज नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा प्राण
संजय राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मी आम्ही लिहिणारे लोक आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र हा लोकशाहीचा प्राण आहे. जे विचार आम्हाला पटत नाही, त्याचा प्रतिवाद आम्हाला करता येईल. मात्र एखाद्या समितीने दिलेला पुरस्कार विचारपूर्वक असतो. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे घाई घाई पुरस्कार काढणे योग्य नाही. हे लोकशाही व स्वातंत्र्याला धरून नाही. पुरस्कार वापसी किंवा पुरस्कार परत घेण्यामुळे उलट अधिक प्रसिद्धी मिळून त्याचे जास्तीत जास्त वाचन होईल. हा निर्णय शहाणपणाचा नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.
कडू सत्ताधाऱ्यांच्या मागे चिपळ्या वाजवतात
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात राऊत म्हणाले की, बच्चू कडू कोणावर टीका करू शकता. कोणालाही पाठिंबा देऊ शकता. उद्या आमचे सरकार आले तर ते आमची पालखी घेऊन सगळ्यात पुढे। असतील. त्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. राज्यात असे अनेक लोक आहेत की ज्यांना सत्ता आली की पुढे असतात चिपळ्या वाजवत असे सांगत त्यांनी कडू यांची खिल्ली उडवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.