आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना नाहक फटका:पुस्तकांअभावी मुक्त विद्यापीठाने अर्थशास्त्राचा पेपर ढकलला पुढे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिन्यापासून पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमांची निम्मी पुस्तकेच तयार झाली नाहीत. असे असतानाही वेळेअभावी विद्यापीठाने १५ जानेवारी ही परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यास विरोध केला अन् लागलीच विद्यापीठाने अर्थशास्त्र अभ्यासक्रमांची परीक्षा आता पुस्तक नसल्याने पुढे ढकलली आहे.

परीक्षेची पुढील तारीख अद्याप जाहीर केली नसून ती केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे. शिवाय इतर विषयांच्या परीक्षांबाबत अद्यापही पुरेसे पुस्तक उपलब्ध होणे गरजेचे असतानाही ४ पैकी २ पुस्तकांवरच आता पेपर असल्याने विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहणार आहे. मुक्त विद्यापीठाची हिवाळी परीक्षा १५ जानेवारीला होणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. पण, त्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले पुरेसे पुस्तकच उपलब्ध करून दिले नाही.

आता २४ डिसेंबरला शेवटचे पुस्तक आॅनलाइन टाकण्यात आले. काही पुस्तकांमध्ये पुरेसे घटकच नाही. ६ एेवजी ३ ते ५ घटकांचाच समावेश आहे. लेखकांनी लिहिलेल्या या पुस्तकावर आयएसबीएन नंबरही नाही. दुसऱ्या बाजूने पुस्तकांचे विद्यार्थ्यांकडून पैसेही घेतले आहे. शिवाय आता आॅनलाइन पुस्तक उपलब्धतेमुळे या पुस्तकांच्याही प्रिंट काढण्यासाठी विद्यार्थ्यांना वाढीव खर्च करावा लागेल.

शुल्क परतीची मागणी
विद्यार्थ्यांनी परीक्षाच हाेत नसल्याने पुस्तकांचे भरलेले शुल्क परत द्यावे, अशी मागणी केली असून विद्यापीठाकडून त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. परंतु, आता अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुस्तक उपलब्ध होईपर्यंत अभ्यासाचा वेळ मिळणार असला तरीही इतर विषयांच्या परीक्षांचे काय? त्यांनाही पुस्तके उपलब्ध नसल्याने अभ्यास करता आला नसल्याने वेळ मिळावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी म्हणून विद्यापीठाचे परीक्षा िनयंत्रक बी. पी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...