आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण आताच्या एकाच आयुष्यात खूप मृत्यू बघत आहोत. मृत्यूचा रेट बघूनच धडकी भरते. एटीएमच्या रांगेत लोक मरतात, लहान बालके मरतात असे अनेक मृत्यू होत असताना ‘ये तो चलता है’ असं म्हटलं जातं. काहीही कारणाने खोटा आळ ठेवला जातो आणि त्याला झुंडीनं अमानुषपणे मारलं जातं अशा दुर्दैवी घटना आपण एकाच काळात बघतो आहोत. आताचं वातावरण म्हणजे असहमती, असहिष्णू आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचं असल्याची मत उद्गीर येथे होणाऱ्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गणेश विसपुते यांनी व्यक्त केली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि नाशिककरांच्या वतीने आयटक येथे विसपुते यांचा लेखक बी. जी. वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विसपुते म्हणाले की, समाजाला आपल्या मूलभूत हक्क, अधिकारांची आठवण करून देणं गरजेचं आहे. न्यायालय, पंतप्रधान, राष्ट्रपती, अधिकारी हे आपले नोकर आहेत याची जाणीव करून द्यायला हवी. सध्याचं वातावरण जरी गळचेपीचं असलं तरी त्याविरोधात आपल्याला उभं रहावं लागेल. आपण कुठे हरलो, कुठे चुकलो हे समजून घेण्याची आता वेळ आहे. त्यामुळेच आपण प्रतीकं, उत्सवात न अडकता एक वेगळ्याप्रकारे नियोजन करावं लागेल. आता हताश करणारं वातावरण आहे. बधिरपणाच्या एका कडेलोटावर आपण आलो आहोत. मात्र आता आपल्याला बोलतं व्हायला लागेल, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. यावेळी प्रभाकर धात्रक, जाधव, कॉ. राजू देसले, संजय जगताप, यशवंत पाटील, वसंत एकबोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सार्वजनिक वाचनालयाच्या सत्कारानंतर ते म्हणाले की, संमेलने कितपत औचित्यपूर्ण आहेत याचा विचार व्हायलाच हवा. पुस्तकं घेणं, नवीन विचारांपर्यंत नेणं हे खरं काम आहे. कारण येणाऱ्या पिढीला अधिक संघर्ष करावा लागणार आहे. मात्र संमेलनांना उत्सवी मोठोठ्या गोष्टींमध्ये दीपवून टाकण्याची खोड लागली आहे. मात्र कोणीच काही बोलत नाही. मंडण, खंडण आणि वितंडा अशी निरोगी लोकशाही सांगते. त्या परंपरेचं पुनरुज्जीवन आपण करायला हवे. काही आवाज क्षीण आहेत ते आपण पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शत्रू-मित्र विवेकाचं सौंदर्य पुन्हा आणायला हवं, असंही ते म्हणाले. यावेळी नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, श्रीकांत बेणी यांच्यासह सावानाचे पदाधिकारी व साहित्यरसिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.