आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ नागरिकांना बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी दहा प्रकारचे फाेटाे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. यापैकी कुठलेही एक ओळखपत्र साेबत बाळगून ज्येष्ठांना प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यभरातील सर्व आगारप्रमुखांना पत्राद्वारे यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. राज्यातील ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के प्रवास सवलत लागू केलेली आहे. सप्टेंबर २०२२ पासून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून पूर्णत:
माेफत प्रवास सुविधा दिली जात आहे. मात्र, ओळखपत्रांच्या मुद्द्यावरुन वाहक व ज्येष्ठ नागरिकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहे. ज्येष्ठांकडून पुरावा म्हणून दिली जाणारी काही ओळखपत्र वाहकांकडून नाकारली जात असल्याच्या तक्रारी महामंडळाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत महामंडळाने ३१ जानेवारीला नवीन आदेश काढून दहा प्रकारची फाेटाे ओळखपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक वाहकाने संबंधित ओळखपत्रे बघून ज्येष्ठांना सवलतीचे तिकिट द्यावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही नियमाप्रमाणे ग्राह्य धरली जाणारी ओळखपत्रे दाखवून बसमधून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओळखपत्राच्या पडताळणीची कसाेटी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या काही ओळखपत्रांच्या सत्यतेची पडताळणी करणे जिकरीचे काम आहे. सवलतीच्या एसटी बस प्रवासाचा लाभ घेण्यासाठी अनेक जण बाेगस ओळखपत्र तयार करतात. चुकीच्या जन्मतारखा टाकून बनावट आधारकार्ड बनविले जाते. प्रवाशाचे वय ६५ नसतानाही त्याच्याकडे वयाचा पुरावा देणारे आधारकार्ड आहे म्हणून प्रवासात सवलत द्यावी लागते. अशा ओळखपत्रांची सत्यता कशी तपासणार हा खरा प्रश्न आहे. वादाचे प्रकार टाळण्यासाठी ओळखपत्रांच्या सत्यतेची खात्री करणारी यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.