आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरांमध्ये झपाट्याने व्यावसायिक आस्थापना तसेच दुकानांमध्ये भर पडत असून या ठिकाणी जुन्या व जीर्ण झालेल्या विद्युत तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन अग्निकांड होण्याची भीती लक्षात घेत मॉल, छोटी दुकाने, रहिवासी इमारती, मंगल कार्यालय, सरकारी इमारती, सभागृहे यांना विद्युत ऑडिट करून घेण्याचे आदेश महापालिकेच्या अग्निशामन विभागाने दिले आहेत. हे ऑडिट करण्यासाठी तज्ञ सल्लागार समिती नियुक्तीसाठी महावितरणकडे पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी महापालिकेने महावितरणकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांच्याकडून दाद मिळाली नव्हती.
गंजमाळ येथे गेल्या महिन्यामध्ये मास्टर मॉलला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाली. पालिकेच्या तपासात या मॉलमध्ये बांधकामात अनाधिकृतपणे केलेले बदल आणि वापरातही बदल आढळून आले होते. तात्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी या मॉलच्या बांधकामाची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या चौकशीतून मॉलचे बांधकामच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
हॉलच्या जागेचा वापर गोडावूनसाठी करण्यात आल्याचे आढळून आले होते. यापूर्वी महात्मा गांधी रोडवर बेसमेंट मध्ये असलेल्या प्रसिद्ध संगणक विक्री करणाऱ्या मॉलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक जुन्या व्यावसायिक मिळकती असून या ठिकाणी 20 ते 30 वर्षे पूर्वी जुनी विद्युत व्यवस्था असल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी जुन्या वीज वाहकतारा असल्यामुळे शॉर्टसर्किटची भीती आहे.
ही बाब लक्षात घेत महापालिकेने आता ज्या पद्धतीने फायर ऑडिट केले जाते त्याच धर्तीवर इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. विद्युत ऑडिट करून घेण्यासाठी महावितरण कंपनीची मदत घेतली जाणार असून त्यांना तज्ञ सल्लागार व संस्था उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक विभागाने पत्र दिले आहे.
या आस्थापनांना ऑडिटची सक्ती..
शहरातील व्यावसायिक रहिवासी इमारती सरकारी इमारती मंगल कार्यालय गुदामे मॉल मोठी सभागृह यांना विद्युत ऑडिट करणे बंधनकारक आहे.
तीन वर्षांपूर्वी महावितरणला पत्र ; पालिकेला ठेंगा
तीन वर्षांपूर्वी देखील महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र देत शहरातील इमारतींचे विद्युत ऑडिट करणे गरजेचे असल्याचे कळवले होते ज्या पद्धतीने महापालिकेचा अग्निशामक विभाग हायर ऑडिट करून घेतो त्या पद्धतीने आपण आपल्या स्तरावर विद्युत ऑडिट करून घ्यावे व संबंधित माहिती महापालिकेला कळवावी असे पत्र मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांनी दिले होते मात्र महावितरणने त्यास ठेंगा दाखवला. आता मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी पुन्हा एकदा असे पत्र महावितरणला पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.