आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 25 हजार परप्रांतीय कामगार, गरजू, बेघरांची भूक भागवतेय पालघरचे कम्युनिटी किचन

नाशिक3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दररोज तयार होतात 50 हजार डबे, शिवभोजनाच्या माध्यमातून 5500 थाळ्यांची व्यवस्था

दीप्ती राऊत 

२२ मार्चला पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केले आणि लाखो कामगार, कारागीर, मजूर होते तिथे अडकून पडले. कुणी बांधकामाच्या साइटवर मजुरी करणारे, कुणी कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार. कुणी गवंड्याकडे बिगारी म्हणून, तर कुणी मालवाहू गाडीवर क्लीनर. लॉकडाऊनमुळे कामेही बंद झाली आणि गावाकडे परतण्याचे मार्गही. अशा वेळी पहिला प्रश्न पडला तो जेवणाचा. कुणी वसईत कंपनीच्या गोडाऊनमध्ये राहणारे, कुणी विरारला रस्त्यावरच झोपणारे. हातावर पोट भरणाऱ्या पण लॉकडाऊनमुळे अडकलेल्या अशा २५ हजार गरजूंना सध्या पालघरच्या कम्युनिटी किचनमधून दररोज भोजनपुरवठा केला जातोय. त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन, शिवसेना, सामाजिक संस्था आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या सहभागाचा आदर्श नमुना उभा राहिला आहे. रेशन कार्ड गावाकडे असल्याने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या धान्याचाही यांना काही उपयोग होत नव्हता. अशा वेळी पालघर जिल्हा प्रशासन आणि शिवसेना यांनी एकत्रपणे यावर तोडगा काढत सहा कम्युनिटी किचन्स सुरू केली आहेत. यात परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि सामाजिक संस्था यांचाही मोठा हातभार लागला आहे. हॉटेल शेल्टरसारख्या रेस्टॉरंट्सनी सध्या बंद असलेल्या त्यांच्या किचन्स आणि त्यांचा स्टाफ या अन्नपूर्णेसाठी उपलब्ध करून दिला आहे. अशा पाच हॉटेल्समध्ये हे भोजन शिजवले जात आहे. पालघर जिल्हा प्रशासन त्यासाठी आवश्यक धान्य व भाजीपाला उपलब्ध करून देत आहे. त्यानंतर सकाळ-संध्याकाळ मिळून एकूण ५० हजार डबे गरजूंपर्यंत पोहोचवले जातात. 

सामाजिक एकोप्याचे आदर्श उदाहरण 

या कम्युनिटी किचनमधून दररोज सकाळी २५ हजार, सायंकाळी २५ हजार असे ५० हजार भोजनाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्याशिवाय शिवभोजन थाळीच्या माध्यमातून साडेपाच हजार गरजूंना जेेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  प्रशासन, पक्ष संघटना, व्यावसायिक आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या तर काय करू शकतात याचे तसेच सामाजिक एकोप्याचे हे  आदर्श उदाहरण ठरले आहे. - दादा भुसे, पालकमंत्री, पालघर

बातम्या आणखी आहेत...