आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनाथ महाराजांची पालखी:पंढरपूरवारीनंतर त्र्यंबकेश्वरला परतली, भाविकांकडून पुष्पवृष्टीने स्वागत

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर येथून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथे परतली. आषाढी एकादशीसाठी पालखीने त्र्यंबकेश्वर येथून 26 दिवस पंढरपूरपर्यंत पायी वारी केली. तेथून परत प्रवास करीत आज दुपारी पालखीने शहरात आगमन केले.

पालखीचे जंगी स्वागत

शहरात स्थानिक भाविकांनी पालखीचे जंगी स्वागत केले. वाद्यांच्या गजरात पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आल्यावर नाथांच्या चांदीच्या पादुका व पताका ज्योतिर्लिंग भेटीस नेण्यात आल्या. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त भुषण अडसरे व त्यांचे सहकारी विश्वस्तांनी नाथांचे स्वागत व दर्शन केले. नाथांच्या जयघोषात पालखी मेन रोडमार्गे कुशावर्त तीर्थ व तेथुन निवृत्तीनाथ मंदिरात गेली.

ठिकठिकाणी रांगोळ्या

पालखीसोबत निवृत्तीनाथ मंदिराचे विश्वस्त अ‌ॅड. भाऊसाहेब गंभीरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय रणदिवे, पुजक ह.भ.प.सुरेश महाराज गोसावी, जयंत महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी यांच्यासह भालदार, चोपदार व दिंडीतील विणेकरी, टाळकरी, वारकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरात ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर अनेक भाविकांनी पुष्पवृष्टी केली. याप्रसंगी आकर्षक सजावट करून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

राज्यभरातून भाविक सहभागी

यावेळी भाविकांनी भजन सादर केले. सर्वत्र संत तुकाराम महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज यांच्या जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. त्र्यंबकेश्वर संस्थानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला. भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वारीचा मार्ग काढला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते. त्यांनी एकमेकांचा निरोप घेत पुन्हा पुढील वारीला भेटण्याचे वचन एकमेकांना दिले.

बातम्या आणखी आहेत...