आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:पासपोर्ट कार्यालयाचे सर्व्हर डाऊन; गाेंधळ, गैरसाेयीने नागरिकांचा संताप

जहीर शेख | नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकराेड येथील पासपाेर्ट ऑफिसमधील सर्व्हर गेल्या चार दिवसांपासून डाऊन असल्याने नागरिकांना त्याचा माेठा फटका बसत आहे. मंगळवारीही (दि. २२) सक‍ाळपासूनच सर्व्हर डाऊन झाल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णत: ठप्प झाले. त्यामुळे येथे आलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी कार्यालयाच्या ढिसाळ नियाेजनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

सायंकाळपर्यंत सर्व्हरचे काम झाले नाहीच. त्यामुळे गाेंधळात वाढच झाली. अखेर अनेकांना पुढील आठवड्याची तसेच डिसेंबर महिन्याची अपॉइंटमेंट देण्यात आली. यामुळे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांचा वेळ वाया गेल्याने पासपाेर्ट कार्यालयाच्या भाेंगळ कारभारावर अनेकांनी ताेंडसुख घेतले.

पासपोर्ट कार्यालयांकडून विविध कामांसाठी नागरिकांना अपॉइंटमेंट दिली जाते. त्याप्रमाणे मंगळवारी ज्या नागरिकांची अपॉइंटमेंट होती ते पासपोर्ट कार्यालयांमध्ये सकाळी ९ वाजताच पाेहोचले होते. मात्र, या ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे कार्यालयात सकाळी ९ वाजेपासूनच नागरिकांची गर्दी सकाळी ९ पासून दोनशेवर लोक पासपोर्ट काढण्यासाठी रांगा लावून उभे होते. मात्र, पासपोर्ट केंद्राचा सर्व्हर डाऊन झाल्याने कामाचा गोंधळ उडाला होता. दरम्यान सकाळपासून ही समस्या असतानाही बाहेर उपस्थित असणाऱ्या अनेक लोकांना त्याची कल्पना पासपोर्ट कार्यालयातर्फे देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांना पासपोर्ट केंद्राबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. याविषयी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने अनेक लोकांचे येथे येणे फुकट गेले.

पासपाेर्ट कार्यालयातील सर्व्हर संथ झाल्याने या ठिकाणी नागरिकांना असे ताटकळत बसावे लागले. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.नागरिकांना माेबाइलवर पुढील सप्ताहातील तारीख दिल्याचा संदेश सायंकाळी आला.पासपोर्टशी संबंधित सर्व कामे ठप्प झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. बाहेरगावाहून आलेल्या अनेकांचे यामुळे हाल झाले. परदेशात जाण्यासाठी पासपाेर्ट आवश्यक असताे. नागरिकांना ताे सुलभपणे मिळावा यासाठी केंद्र शासनाने सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, शहरातील नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर नेहमीच डाऊन हाेत असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना खाली हात जावे लागत आहे.

नाशिकसह औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना परदेशात जाण्यासाठी नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट तयार करून घ्यावा लागतो. पासपोर्टसाठी बहुतांश व्यक्ती या आपल्या लहान मुलांसह आलेल्या असतात. मात्र या कार्यालयातील सर्व्हर मागील शुक्रवारपासून दिवसभर डाऊन रहात असल्याने पासपोर्टसाठी मुलाखतीला आलेल्या नागरिकांना अक्षरश: कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर दिवसभर बसावे लागत आहे. मंगळवारी (दि. २२) सर्व्हर डाऊन असल्यामुळे मुलाखती आणि कागदपत्र तपासणीसाठी आलेल्या शेकडो नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे येथे आलेल्या अनेकांना मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागला.

एवढा गाेंधळ झाला तरी नियाेजनाचा अभाव
आज माझ्या पत्नीला दुपारी दोन वाजेची अपॉइंटमेंट देण्यात आली हाेती. सर्व्हर डाऊन असल्याने प्रचंड गर्दी हाेती तरी नियाेजन काहीच नाही. अखेरीस साडेचार वाजता पुढील तारखेचा मेसेज दिला - विजय कुशारे, नागरिक

वारंवार सर्व्हर हाेते डाऊन, नियाेजन नाहीच
१५ दिवसांपूर्वी अपॉइंटमेंट घेतली होती.शुक्रवारीही सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे मंगळवारची तारीख मिळाली आणि आता आजही सकाळपासून रांगेत उभे राहूनही नंबर आला नाही. - सागर कोठावदे, नागरिक

सायंकाळी मिळाले नवीन मेसेज
पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर मंगळवारी सकाळपासूनच डाऊन होते. त्यामुळे तेथे नागरिकांना ४-५ तास नागरिकांना वाट पाहावी लागली. सर्व्हर डाऊन होता तर मग बोलावलेच कशासाठी? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. तर, अनेकांना पुढील आठवड्यांच्या तारखा देण्यात आल्याचे मेसेज सायंकाळी उशिरा मिळाले.

बातम्या आणखी आहेत...