आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्याेगांचे प्रश्न साेडविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी व गेल्या तीन वर्षापासून न झालेली जिल्हा उद्याेगमित्र समिती (झूम) ची बैठक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रविवारीच नाशिकमध्ये आयमाच्या सभागृहात उद्याेजकांच्या बैठकीत उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्यासमाेर याबाबत तक्रारी झाल्यानंतर दर महिन्यात ही बैठक झालीच पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले हाेते. त्याला प्रशासनाने तत्काळ हरताळ फासल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उद्याेगवर्तुळात उमटत आहेत.
उद्याेगांचे प्रश्न तातडीने सुटावेत याकरीता स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक नियमित व्हावी, असे राज्य शासनाचे संकेत आहेत. मात्र नाशिकमध्ये गेल्या काही वर्षापासून बैठकीचे समन्वयक असलेल्या जिल्हा उद्याेेग केंद्राच्या बाबतीत उद्याेजकांची नाराजी उघडपणे समाेर आली आहे. जिल्हाधिकारी विलास पाटील असतांना याच बैठकीतून उद्याेजकांनी ढिसाळ कारभारावरून बहिष्कार टाकत वाॅकआऊट केला हाेता.
काेराेनाच्या संकटकाळात उद्याेगांचे कामकाज सुरू असताना उद्याेजक संकटांचा सामना करत असताना या आॅफलाइन बैठका तरी हाेणे अपेक्षित हाेते मात्र ती झाली नाही. आज काेविडचे सगळे निर्बंध उठवून वर्ष झाले तरी तीन वर्षांनंतरही ही बैठक हाेऊ शकलेली नाही.
उद्याेजकांची उपेक्षा का?
एका बाजुला थेट उद्याेगमंत्री समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हया जिल्ह्यात जात असतांना दुसरीकडे मात्र उद्याेजकांना एका महत्वाच्या बैठकीसाठी मात्र तारीख पे तारीख दिली जात असल्याने आमची येथे अशीच उपेक्षा हाेत राहणार का? असा संताप उद्याेगवर्तुळात दिसून येत आहे. यामुळे उद्याेगमंत्र्यांनी दिलेल्या इतर आश्वासनांचीही अशीच बाेळवण तर हाेणार नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
उद्याेगमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ, उद्याेजक नाराज
उद्याेगमंत्री उदय सामंत स्वत: उद्याेजकांच्या दारी येतात ते शासन किती तत्पर आहे, हे उद्याेजकांना सांगतात, दरमहा झूमची बैठक घेण्याचे निर्देश देतात, दुसऱ्याच दिवशी पूर्वनियाेजित बैठक दुसऱ्यांदा स्थगित हाेते. उद्याेजकांशी हा खेळ चालवला असून उद्याेगमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. -ज्ञानेश्वर गाेपाळे, अध्यक्ष, विश्वस्त समिती, आयमा
उद्याेगमंत्र्यांनी आदेश देऊनही गांभीर्यच नाही
उद्याेगमंत्र्यांनी इतक्या गांभीर्याने कालच दर महिन्याला बैठक घ्यायचे निर्देश दिले दुसऱ्याच दिवशी नियाेजित बैठकदेखील स्थगित केली गेल्याने उद्याेजक नाराज आहेत. प्रशासनाला उद्याेजकांची वेळ, नियाेजन याबाबत गांभीर्य नसून नेमके आता काेणाकडून न्याय मिळेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.- ललित बूब, सेक्रेटरी, आयमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.