आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीचा सूर:पेस्ट कंट्राेल ठेकेदाराला सूट; डेंग्यू अळी आढळल्यास नागरिकांची लूट

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पेस्ट कंट्राेलद्वारे हाेणारी आैषध व धूरफवारणी कागदाेपत्रीच हाेत असल्याचे चित्र असताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे साेडून सामान्य नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे प्रकार पालिकेत सुरू झाले आहेत. मलेरिया विभागाने आता डेंग्यूचे वाढते आकडे लक्षात घेत घरांसह व्यावसायिक इमारती, सरकारी कार्यालये, बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती आढळल्यास प्रतिस्पॉट २०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी, ठेकेदारांवर कारवाई करण्यात चालढकल का केली जात आहे असा सवाल उपस्थित हाेत आहे.

पावसानंतर आता डबक्यांमध्ये तसेच खड्ड्यांत पाणी साचून कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव हाेत आहे. त्यात डेंग्यू, चिकुनगुन्या व अन्य साथराेगांनी डाेके वर काढले आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९९ रुग्ण, सप्टेंबरमध्ये आजपर्यंत ९८ रुग्णांची नोंद आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २७० डेंग्यूबाधित आढळले आहेत. मध्यंतरी पालिकेने घरोघरी सर्वेक्षण केल्यानंतर, व्यावसायिक इमारती, सरकारी इमारतींमध्येच डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यावेळी ५२५ जणांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र आता डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास प्रतिस्पॉट २०० रुपये दंड करण्याचा निर्णय झाला आहे.

दंडासह जनजागृतीही करणार
घरांसह व्यावसायिक मिळकतींमध्ये डेंग्यूचे डास आढळल्यास प्रतिस्थान विभागीय अधिकाऱ्यांमार्फत दाेनशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीमही हाती घेतली जाणार आहे.- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ. मलेरिया विभाग

कारवाई करण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर
मुळात पेस्ट कंट्राेल ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने घराेघरी जाऊन अळ्या नष्ट करणे, आैषध फवारणे अपेक्षित असून ठेकेदाराएेवजी आता विभागीय अधिकाऱ्यांकडे डेंग्यू अळी निर्मूलनाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळ व अन्य कामांचा बाेजा असलेल्या विभागीय अधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे.