आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पेठराेडची दुरवस्था; भाजपच्या माजी नगरसेवकांमध्येच जुंपली

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकहून गुजरातला जाेडणाऱ्या पेठराेडच्या अडीच किलाेमीटरचा रस्त्यावर खड्ड्यांची चाळण हाेऊन उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशांचे आराेग्य धाेक्यात आले असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच प्रभाग क्र. १ मधील भाजपच्या तिघा माजी नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. यात प्रभागाचे माजी नगरसेवक तथा गटनेते अरुण पवार यांनी या रस्त्याच्या दुरस्तीसाठी तातडीने मनपाकडे निधी नसल्यास याच प्रभागात सुमारे ४० काेटी खर्चाचे जे स्टेडियमचे काम हाती घेण्यात आले आहे, ते अनावश्यक असून ते रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे पत्रच मनपा आयुक्तांना दिले आहे.

विशेष म्हणजे, प्रभागाचे माजी नगरसेवक व माजी स्थायी सभापती गणेश गिते यांचाच ड्रीम प्राेजेक्ट म्हणून स्टेडियमसाठी ४० काेटींची तरतूद केल्याने त्यांच्याच कामाला पवार यांनी पत्राद्वारे विराेध दर्शविला आहे. पेठरोडवरील राऊ हॉटेल (मखमलाबादनाका) पासून पुढे तवली फाट्यापर्यंतच्या अडीच किलाेमीटरच्या मनपा हद्दीतील रस्त्याची दुरवस्था झाली असून जागाेजागी खड्डे पडले आहेत. गुजरातला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ८४८ असून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. पावसाळ्यापासून दुरवस्थेत आणखीच भर पडली आहे. वाहनांची २४ तास वर्दळ असते. त्यामुळे परिसरातील घराघरात धूळ पसरते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मणक्याचे त्रास व धुळीमुळे श्वसनाचा विकारही हाेऊ लागले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार रहिवाशांकडून प्रभागतील नगरसेवकांकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यावर मनपा प्रशासनाकडून निधीच नसल्याचे उत्तर दिले जात आहे.

यावरून संतप्त रहिवासी, व्यापारी, दुकानदार व्यावसायिक एकत्रित येऊन येत्या साेमवारी (दि. २१) रास्ता राेकाे करण्यासाठी पाेलिसांकडे परवानगी मागितली. या अनुषंगाने प्रभागाचे नगरसेवक पवार यांनीच आता मनपा आयुक्तांना पत्र लिहून मनपा बांधकाम विभागास वारंवार संपर्क साधूनही कोणतीही उपाय योजना होत नसल्याने हतबलता व्यक्त केली आहे. निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात असल्याने नागरिकांकडून धारेवर धरले जात आहे.

स्टेडियमसाठीचे भूसंपादन चुकीचे : पवार यांनी दिलेल्या पत्राचा आशय असा, रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने रस्त्यालगत सर्व्हे नं. ३२५, ३२७, ३२८ येथे स्टेडियमचे काम सुरू केले असून त्याची आवश्यकता नव्हती. नागरिकांच्या मूलभूत कामांना प्राधान्य न देता चुकीच्या ठिकाणी निधी वापरणे कितपत योग्य आहे? स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता टेकडीवर स्टेडियम करणे व त्यासाठी भूसंपादन चुकीचे आहे. भूसंपादन रद्द करून स्टेडियमचे बांधकाम तात्पुरते बंद करावे. ताे निधी पेठरोडवर वापरून नागरिकांना मरणयातनांच्या त्रासातून मुक्त करावे, ही लोकांसाठी आग्रहाची विनंती.

तिघे माजी नगरसेवक निधीसाठी जाणार राज्य शासनाकडे
स्टेडियमचे काम यापूर्वीच हाती घेतले असून पेठरोड दुरुस्तीसाठी आम्ही तिन्ही नगरसेवक एकत्र आहे. शासनाकडे जाऊन निधी मिळवणार. - गणेश गिते, माजी सभापती, स्थायी समिती

बातम्या आणखी आहेत...