आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रातीपूर्वीच मुक्या जीवांवर संक्रात:नायलॉन मांजाने कबुतराचा गळा कापल्याने मृत्यू, तर दुसऱ्याला वाचवण्यात यश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात नायलॉन मांजाला बंदी असूनही त्याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे संक्रातीपूर्वीच पक्षांवर संक्रात येत असून मांजाने गळा कापल्यामुळे शांतीदूत समजल्या जाणाऱ्या कबुतराचा मृत्यु झाला. याचवेळी घडलेल्या घटनेत दुसऱ्या कबुतराला वाचविण्यात यश आले.

सातपूर परिसरातील थाेरात पार्क इमारतीजवळ नायलाॅन मांजात अडकल्याने दाेन कबुतरे खाली पडली हाेती. दाेन्ही कबुतरांच्या गळ्याभाेवती व पायास नायलाॅन मांजा अडकला हाेता. सुभाष खैरनार व शिवा हतांगले यांनी नॉयलॉन मांज्यातुन कबुतराची सुटका करत त्याच्यावर प्रथमोपचार केले.

विक्रेत्यांवर कारवाई करा

परिसरात फेकलेल्या नॉयलॉन मांज्याच्या गुंत्याने चिमण्या, कबूतर, इतर छोटे पक्षी फसून जखमी होत असल्याचे चित्र आहे. अनेक चिमण्या, कबूतर पायात मांजा अडकलेले दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दुचाकीवरून जात असताना प्रवीण वाघ यांची नॉयलॉन मांज्याने मान कापल्याने आठ टाके पडले होते. संक्रातिला एक महिना अवकाश आहे तरीही नॉयलॉन मांजा सहज उपलब्ध होत असून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून हाेत आहे.

यंत्रणेचे दुर्लक्ष

नायलाॅन मांज्यामुळे पक्षांसह माणसांनाही इजा पाेहाेचत असल्याने शहरात नायलाॅन मांजाला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका व पोलिस यांच्या संयुक्त पथकाने गेल्या वर्षी मांजा विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून लाखाे रुपयांचा मांजा जप्त केला हाेता. यावर्षी मात्र दाेन्ही यंत्रणा सुस्त झाल्याने शहराच्या विविध भागांमध्ये सर्रासपणे नायलाॅन मांजाची विक्री हाेताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस व महापालिका यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे.

पालकांवर कारवाईचा इशारा

बंदी असलेला नायलॉन मांजामुळे कोणाच्या जीवितास हानी झाल्यास संबंधित मांजा विक्री करणाऱ्यावर थेट तडीपारीची तर लहान मुले मांजा विक्री करताना अथवा उडवताना आढळल्यास त्यांच्या पालकावर कारवाई करण्यात इशारा पोलिस यंत्रणेने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...