आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील दिग्दर्शक सचिन शिंदे हे सातारा येथील परिवर्तन संस्थेच्या मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरले आहेत. 'मानसरंग' संकल्पक आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर आणि आरोग्य संवादक राजू इनामदार यांनी ही घोषणा केली.
नाट्यक्षेत्रासाठी ऊर्जा
नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे ( नाशिक) यांच्या सोबतच अभिजीत झुंजारराव (कल्याण आणि क्षितीज दाते (पुणे) यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. यावेळी सचिन शिंदे म्हणाले की, नाट्यक्षेत्रात विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवर केलेल्या कामाचे समाधान वाटते. यामुळे आणखी १० वर्षे नाट्यक्षेत्रात काम करण्याची ऊर्जा मिळेल अशी खात्री आहे. हा केवळ माझा बहुमान नसून नाशिक मधील सर्व रंगकर्मींचा सन्मान आहे. नाशिककर नाट्यकर्मी व रसिक यांच्या साथीने नाशिकच नाव जगभर पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचीच ही पावती असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मानसरंग'चे समन्वयक राजू इनामदार आणि रेश्मा कचरे ह्या वेळी उपस्थित होते.
अशी आहे शिष्यवृत्ती
अतुल पेठे म्हणाले कि, 'परिवर्तन' संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी 'मानसरंग' नावाचा मंच चालवला जातो. या 'मानसरंग' मंचाचा एक कार्यक्रम म्हणून या वर्षी पासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी 'मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती' जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तीनही दिग्दर्शक आजच्या रंगभूमीवर कार्यरत असून, या नाट्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्याच्या विषयी भाष्य करणारे नाटक बसवणार आहेत. त्याकरता त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत बसवण्यात आलेल्या तीनही नाटकांचा 'मानसरंग' नाट्य-महोत्सव हा पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिवशी पुणे येथील 'द बॉक्स' या रंगमंचावर केला जाणार आहे.
मानसिक आरोग्याचे प्रश्न
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की मानसिक आरोग्याचा प्रश्न हा सध्याच्या कालखंडात एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे. कोरोना नंतरच्या कालखंडात त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अजूनदेखील आपल्या समाजात मानसिक आजारांच्या विषयी पुरेशी माहिती नाही. मानसिक आजारांकडे कलंकाच्या नजरेतून बघितले जाते. पालकत्व, पती-पत्नी मधील ताण-तणाव, कामाच्या ठिकाणचे ताण, मोबाईलचा वाढता वापर असा एक मोठा मानसिक आरोग्य आणि आजार यांचा पट आपल्या समोर आहे. या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून भिडण्याचा 'मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती' आणि नाट्य-महोत्सव हा प्रयत्न आहे. '
उपक्रमाचे मार्गदर्शक
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, नाटककार आणि समीक्षक डॉ.राजीव नाईक, लेखिका डॉ. अंजली जोशी आणि नाटककार डॉ. चंद्रशेखर फणसळकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.